Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. देशासह परदेशात त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक होतं. प्रदीप रावतने आता शाहरुखबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. प्रदीप रावत 80-90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आमिर खानच्या 'गजनी' या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्याच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. प्रदीपने शाहरुखच्या 'कोयला' (Koyla) या चित्रपटात काम केलं होतं. 'कोयला' हा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस उतरला. आता प्रदीप रावतने खुलासा केला आहे की, शूटिंगदरम्यान शाहरुख खान फक्त सिगारेटचा धूर काढायचा".
शाहरुख खान फक्त सिगारेटचा धूर काढायचा...
प्रदीप रावतने नुकताच सिद्धार्थ कन्नला मुलाखत दिली आहे. त्यावेळी प्रदीपने 'कोयला' चित्रपटातील शूटिंगदरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला. प्रदीप रावत म्हणाला की,"शाहरुख खानच्या मी जास्त जवळ नव्हतो. पण त्याचं वैयक्तिमत्त्व खूपच शानदार आहे. शाहरुख खान प्रचंड धूम्रपान करत असे. त्याच्याइतका धूम्रपान करणारा माणूस मी कधीही पाहिला नाही. तो एक सिगारेट अर्धवट ओढून फेकून द्यायचा आणि त्यानंतर लगेचच दुसरी ओढायला घ्यायचा. ती सिगारेटदेखील अर्धवट पीऊन फेकून द्यायचा. शाहरुख चेन स्मोकर होता. पण कामात मात्र तो 100% देत असे".
'कोयला'चा सहाय्यक दिग्दर्शक होता हृतिक रोशन
प्रदीप रावत म्हणाले की,"कोयला' चित्रपटाच्या शूटिंगनंतर राकेश रोशन चित्रपटाच्या संपूर्ण टीमला घेऊन एकत्र पार्टी करत असे. निर्माता राकेश रोशनचा मुलगा हृतिक रोशन (Hrithik Roshan) त्यावेळी या चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक होता. त्यावेळी तो जॉनी लीव्हरला स्क्रिप्ट देत असे".
शाहरुख खानचे 2023 मध्ये तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते. यात 'पठाण' (Pathaan), 'जवान' (Jawan) आणि 'डंकी' (Dunki) या चित्रपटांचा समावेश आहे. शाहरुख खानचे दोन चित्रपट सुपरहिट ठरले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. 'डंकी'तील शाहरुख खानच्या अभिनयाचंही सर्वत्र कौतुक झालं. आता शाहरुख खानचा 'किंग' (King) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'कोयला' चित्रपटाबद्दल जाणून घ्या.. (Koyla Movie Details)
'कोयला' हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला. राकेश रोशनने या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि अमरीश पुरी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती.
संबंधित बातम्या