Pathaan Box Office Collection: सध्या देशभरात पठाण (Pathaan) या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. पठाण या हिंदी चित्रपटानं केवळ भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घातला. शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) पठाण चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत होते. आता हा चित्रपट रिलीज होऊन 27 दिवस झाले आहेत. या 27 दिवसांमध्ये पठाण चित्रपटाच्या तिकीटाची किंमत अनेकदा कमी करण्यात आली. तिकीट दर कमी केल्याचा पठाण या चित्रपटाला फायदा झाला का? याबद्दल जाणून घेऊयात...
16 फेब्रुवारीला तिकीट दर केला होता कमी
16 फेब्रुवारीला पठाण या चित्रपटानं भारतातील बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा टप्पा पार केला. त्याच दिवशी यशराज फिल्म्सनं या चित्रपटाचा तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 17 फेब्रुवारीला पठाण या चित्रपटाचा तिकीट दर 110 रुपये करण्यात आला. 17 फेब्रुवारीला या चित्रपटानं 2.50 कोटींची कमाई केली होती. तिकीट दर कमी करुनही या चित्रपटानं 10 कोटींचे कलेक्शन देखील केले नाही. त्यामुळे इतर दिवसांच्या कलेक्शनच्या तुलनेत 17 फेब्रुवारीला तिकीट दर कमी केल्यानं देखील पठाणला फारसा फायदा झालेला नाही, असं म्हणता येईल.
18 आणि 19 फेब्रुवारीला 200 रुपये तिकीट
18 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारीला पठाणचा तिकीट दर 200 रुपये करण्यात आला होता. 18 तारखेला शनिवार आणि 19 तारखेला रविवार होता. वीकेंड असल्यानं तिकीटांचे दर कमी करण्यात आले होते. तरण आदर्श यांच्या ट्वीटनुसार, या चित्रपटानं 18 तारखेला 3.25 कोटींची कमाई केली. तर 19 फेब्रुवारीला या चित्रपटानं 4.15 कोटींची कमाई केली. 17 आणि 20 फेब्रुवारीचं कलेक्शन पाहता हे कलेक्शन जास्त आहे. त्यामुळे वीकेंडला 200 रुपये केल्याचा पठाण चित्रपटाला फायदा झाला.
20 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीचे तिकीट दर
20 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या दरम्यान पठाण हा चित्रपट 110 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. तरण आदर्शच्या ट्वीटनुसार, काल (20 फेब्रुवारी) या चित्रपटानं 1.20 कोटींची कमाई केली. आता 21, 22 आणि 23 तारखेला हा चित्रपट किती कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
पहिल्या आठवड्यात दणक्यात सुरुवात पण नंतर मात्र कमाईला ब्रेक
पठाण या चित्रपटानं पहिल्या आठड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. रिपोर्टनुसार, रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं भारतात 55 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 70 आणि तिसऱ्या दिवशी 39 कोटींची कमाई केली. पहिल्या आठवड्यात या चित्रपटानं जवळपास 300 कोटी कमाई केली. पण पहिल्या आठवड्याच्या तुलनेत या चित्रपटानं केल्या काही दिवसांमध्ये कमी कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट पाहण्याचा उत्साह, चित्रपटाचे प्रमोशन, चित्रपट रिलीज होण्याआधी झालेली कॉन्ट्रोव्हर्सी या सर्व कारणांमुळे या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात जास्त कमाई केली, असं म्हटलं जात आहे. पण पहिल्या आठवड्यानंतर या चित्रपटाच्या कमाईला ब्रेक लागला आहे, असंही म्हणता येईल.