Pathaan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट काही दिनवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला. पठाण चित्रपटातील गाणं आणि चित्रपटाचा काही भाग बदलण्याची सूचना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी फिल्ममेकर्सला दिली होती. आता सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने पठाण चित्रपटाला UA प्रमाणपत्र दिले आहे. या चित्रपटामधील गाण्यामध्ये आणि डायलॉग्समध्ये बदल करण्यात आले आहेत. 


बेशरम रंग गाण्यात बदल-


'बेशरम रंग' या गाण्यात देखील काही बदल करण्यात आले आहेत. 'बेशराम रंग' या गाण्यातील 'बहुत तंग किया' या गाण्याच्या ओळीमधील शॉर्ट्समध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच काही डान्स स्टेप्स काढून टाकल्या आहेत. 


हे शब्द बदलले-


चित्रपटातील डायलॉग्समध्ये 'अशोक चक्र' हा शब्द बदलून 'वीर पुरस्कार' करण्यात आला आहे. चित्रपटातील संवादामधील RAW हा शब्द काढून त्या जागी 'हमारे' या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. चित्रपटात एका ठिकाणी 'मिसेस भारत माता' म्हटले होते, त्या जागी 'हमारी भारत माता' असा डायलॉग वापरण्यात येणार आहे. चित्रपटातील सर्व ठिकाणी (एकूण 13 ठिकाणी) वापरलेला 'पीएमओ' हा शब्द काढून टाकण्यात आला आहे आणि त्याच्या जागी 'मंत्री' किंवा 'राष्ट्रपती' शब्द वापरण्यात आला आहे.


स्क्रीनवर एका ठिकाणी 'Ex-KGB' च्या जागी 'Ex-SBU' वापरण्याची सूचना सेन्सॉरनं दिली. चित्रपटात Black Prison, Russia असे लिहिले आहे, जे बदलून फक्त 'ब्लॅक प्रिझन' असे म्हटले आहे. 'लंगडे-लुले' हा शब्द बदलून 'तुटे-फुटे' असा  करण्यात आला आहे. चित्रपटात एक संवाद आहे, 'इसे सस्ती स्कॉच नहीं मिली?' या संवादातील 'स्कॉच' च्या जागी 'ड्रिंक' हा शब्द वापरला जाईल. 'पठाण' चित्रपट 2 जानेवारी रोजी सेन्सॉर झाला असून चित्रपटाचा एकूण कालावधी 146 मिनिटे म्हणजेच दोन तास 26 मिनिटे आहे. 


पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी  रिलीज होणार आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषेंमध्ये प्रदर्शित होणार आहे.  सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. शाहरुखसोबतच पठाण चित्रपटात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  250 कोटींच्या बजेटमध्ये 'पठाण' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Pathaan: 'पठाण' चित्रपटातील काही भाग आणि गाणं बदला; सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांची सूचना