मुंबई: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा आज 52 वा वाढदिवस. बर्थ डे निमित्त शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर अक्षरश: गर्दी केली.


मात्र त्याला शुभेच्छा देण्यासाठी ‘मन्नत’वर जमलेल्या त्याच्या चाहत्यांना मोठा फटका बसला. शाहरूख खानला शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या फॅन्सचे चक्क मोबाईल फोन्स आणि पाकिटावर चोरट्यांनी हात साफ केले.

शाहरुख खान आज मुंबईत नसतानाही त्यांच्या मन्नत या बंगल्याबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा घेऊन अनेकांचे फोन चोरीला गेलेत. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारी नोंदवल्या असून तपास सुरु केला आहे.

अलिबागमध्ये बर्थडे सेलिब्रेशन

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा आज वाढदिवस. किंग खान आज 52 वर्षांचा होत आहे. शाहरुखच्या बर्थडेच्या आधीपासूनच त्याच्या चाहत्यांनी ट्विटरवर बर्थडे बाबतचे ट्रेण्ड केले होते. त्यावरुनच चाहते शाहरुखचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी किती उत्सुक आहेत, हे यावरुन दिसून येतं.

शाहरुखचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या मित्र परिवाराने शाहरुखच्या अलिबागच्या फार्महाऊसची निवड केली आहे. तिथेच त्याचं बर्थडे सेलिब्रेशन होईल.

शाहरुख त्याची पत्नी गौरी खान, बहिण शहनाज, मुलगी सुहाना हे नुकतेच गेटवे ऑफ इंडियावर दिसले होते. तिथूनच ते अलिबागच्या फार्म हाऊसकडे रवाना झाले.