'स्माईल प्लीज'च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात शाहरुखकडून विक्रम फडणीसची मस्करी
एबीपी माझा वेब टीम | 27 Jun 2019 12:47 PM (IST)
मोठमोठ्या बॉलिवूड कलाकारांचे कपडे डिझाईन करणाऱ्या विक्रम फडणीसचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट 'हृदयांतर' होता. तर 'स्माईल प्लीज' हा त्याचा दुसरा चित्रपट असून तो 19 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : आगामी 'स्माईल प्लीज' या मराठी सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्याच्या लॉन्चला बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने हजेरी लावली. फॅशन डिझायनर विक्रम फडणीसने 'स्माईल प्लीज' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे मित्राच्या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चसाठी शाहरुखने खास उपस्थिती लावली. फॅशन डिझायनर ते चित्रपट दिग्दर्शक असा प्रवास करणाऱ्या विक्रम फडणीसचं शाहरुख खानने तोंडभरुन कौतुक केलं आणि 'स्माईल प्लीज' या नव्या चित्रपटासाठी त्याला शुभेच्छाही दिल्या. मोठमोठ्या बॉलिवूड कलाकारांचे कपडे डिझाईन करणाऱ्या विक्रम फडणीसचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट 'हृदयांतर' होता. तर 'स्माईल प्लीज' हा त्याचा दुसरा चित्रपट असून तो 19 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमात मुक्ता बर्वे, प्रसाद ओक आणि ललित प्रभाकर हे मुख्य भूमिकेत आहेत. यावेळी शाहरुख खानने विक्रम फडणीसची थट्टाही केली. शाहरुख विक्रमला म्हणाला की, "तू कितीही मोठा माणूस बनलास तरही तू तुझ्या कार्यक्रमात सोनेरी रंगाची टाय घालून कसा काय येऊ शकतो? शाहरुख भरकार्यक्रमात आपली थट्टा करेल याचा विक्रमला अंदाज नव्हता. मग विक्रमने तातडीने टाय काढून प्रेक्षकांच्या रांगेत बसलेल्या आपल्या मित्रांच्या दिशेने भिरकावला. यावेळी शाहरुखने हसतच विक्रमला मिठी मारली आणि हा फक्त विनोद होता असं सांगितलं. पण थट्टा सुरुच ठेवून शाहरुखने विक्रमला सल्ला दिला की, "ही टाय पुन्हा घालू नको, तू असाच चांगला दिसतोस." "तू एवढा सुंदर आहे, मग तुला कपडे देखील घालण्याची काय गरज आहे?" असंही तो मस्करीत म्हणाला. 'स्माईल प्लीज'चा ट्रेलर