मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने जन्माष्टमी साजरी केल्यामुळे देवबंदच्या उलेमांनी आक्षेप घेतला आहे. इस्लाम धर्मात इतर धर्मीयांचे सण साजरे करण्यास मनाई असल्याचं उलेमांनी स्पष्ट केलं.
शाहरुखने मुलगा अब्राहमसोबत दोन दिवसांपूर्वी स्वतःच्या घरी दहीहंडी फोडली होती. त्याचे फोटोही त्याने ट्विटरवर शेअर केले. यावर देवबंदच्या उलेमांनी आक्षेप घेतला आहे. इस्लाममध्ये इतर धर्मीयांचे सण साजरे करणं गैर आणि अनैतिक असल्याचा उल्लेख उलेमांनी केला आहे.
शाहरुख मुसलमान असून त्याने गैर-मुस्लिम सण साजरे करणं अनैतिक आहे, असा फतवा ऑन मोबाईल सर्व्हिसचे संचालक मुफ्ती अरशद फारुकी यांनी काढला आहे.
चित्रपट कलाकारांचा कोणताही धर्म नसतो. मात्र शाहरुख सेलिब्रेटी आहे. त्यामुळे कुठल्या धर्माचा सण कशाप्रकारे साजरा करत आहोत, याची काळजी त्याने घ्यायला हवी. एखाद्या सणात सहभागी होणं वेगळी गोष्ट, मात्र आपल्या घरी मुस्लिमेतर सण साजरे करणं शरीयतला मान्य नसल्याचं उलेमांनी म्हटलं आहे.
एखादा कलाकार कुठल्याही धर्माचा असो, सिनेमात त्याला गणपती, ईद, ख्रिसमस, दहीहंडी, दिवाळी असे कोणतेही सण साजरे करण्याला परवानगी आहे. मात्र हेच सण जेव्हा त्यांच्या खासगी आयुष्यात साजरे करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा धर्माच्या पहारेकऱ्यांना आक्षेप असतो. उलेमांच्या या फतव्यामुळे त्यांच्याविरोधात सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे.