मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या कंबरदुखीने त्रस्त आहे. अनुष्काला बल्जिंग डिस्क नावाच्या आजाराने गाठलं आहे. यामुळे एकाच जागी दीर्घकाळ बसून राहणं अशक्य होतं.
अनुष्का सध्या इन्टेन्सिव्ह फिजिओथेरपी सेशन्स घेत आहे.अनुष्कावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिला तीन ते चार आठवडे सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र 'सुई धागा' चित्रपटाचं प्रमोशन सुरु असल्यामुळे ती आराम करत नाहीये.
वरुण धवन आणि अनुष्काची मुख्य भूमिका असेलला सुई धागा हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अनुष्काने बेड रेस्ट न घेता प्रमोशनमध्ये गुंतवून घेतलं आहे.
बल्जिंग डिस्कची लक्षणं काय?
बल्जिंग डिस्कची लक्षणं सहसा लवकर लक्षात येत नाहीत. मणक्याच्या खालच्या बाजूला त्रास झाल्या नितंब आणि जांघांमध्ये दुखतं. जर तुम्हाला बल्जिंग डिस्कचा त्रास मणक्याच्या वरच्या भागात जाणवला, तर खांदे आणि हातात जास्त दुखतं. शिंक किंवा खोकल्यास त्रास वाढतो. मांसपेशी कमजोर झाल्यामुळे अंगदुखीचा त्रास होतो.
बल्जिंग डिस्कची कारणं काय?
वयोमानापरत्वे बल्जिंग डिस्कचा त्रास होऊ शकतो. त्याशिवाय अनुवंशिकता, अपघात, धूम्रपान, चुकीचा आहार, वाढतं वजन, व्यायामाचा अभाव अशा असंख्या कारणांमुळे हा आजार होऊ शकतो.
उपचार कसे करावेत?
डॉक्टरांच्या सल्ल्याने बल्जिंग डिस्कवर उपचार करावेत. योग, स्विमिंग, स्ट्रेचिंग यासारखे व्यायाम नियमितपणे केल्यास तुम्हाला बल्जिंग डिस्कचा त्रास उद्भवणार नाही. जड वस्तू उचलताना काळजी घ्यावी. बसताना नेहमी ताठ बसावे. शरीराचं वजनही नियंत्रित ठेवावे.