संजय दत्तचा सिनेमा 'भूमी'च्या सेटवर आग
एबीपी माझा वेब टीम | 04 Jun 2017 12:02 AM (IST)
मुंबई: अभिनेता संजय दत्तचा आगामी सिनेमा 'भूमी'चं सध्या शूटिंग सुरु आहे. याचवेळी या सिनेमाच्या सेटवर आग लागली. ज्यामध्ये अभिनेत्री आदिती राव हैदरी थोडक्यात बचावली. जेव्हा सेटवर आग लागली त्यावेळी आदिती लग्नाच्या एका गाण्यावर शूट करत होती. एका प्रेसनोटनुसार, ही घटना गुरुवारी रात्री उशीरा मुंबईतील आरके स्टुडिओमध्ये झाली. त्यामुळे शुक्रवारी दिवसभरासाठी शुटींग थांबवण्यात आलं. आरके स्टुडिओमध्ये एक भला मोठा सेट उभारण्यात आला होता. जिथे लग्नामध्ये सहभागी झालेले 300हून अधिक डान्सर होते. या गाण्यात आदिती आणि सिद्धांत गुप्त हे दिसणार आहेत. याचं नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्यनं केलं आहे. भूमी हा सिनेमा मुलगी आणि वडिलांच्या नात्यावर भाष्य करणारा आहे. हा सिनेमा सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार असून ओमंग कुमार याचं दिग्दर्शन करत आहे.