Seema Deo: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 81 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी सीमा देव यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट शेअर करुन अभिनेत्री सीमा देव यांना  श्रद्धांजली वाहिली आहे . त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या, मराठी चित्रपटसृष्टीत सालस, प्रेमळ चेहरा असलेल्या आणि चित्रपटसृष्टीसाठी मैलाचे दगड ठरलेल्या सिनेमांमधील भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. सीमा देव यांनी मराठी, हिंदी सिनेमात उल्लेखनीय काम करत नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. हिंदी आणि मराठी अशा जवळपास 80 सिनेमांमध्ये त्यांनी काम केले होते. जगाच्या पाठीवर, मोलकरीण, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला, आनंद, कोशिश यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष उल्लेखनीय ठरल्या. भूमिकांमधील त्यांचा सहज सुंदर वावर आणि भूमिका अक्षरश: जिवंत करण्याचे कसब यामुळे त्यांनी रसिकांची मने जिंकली. प्रत्येक पिढीला त्या आपल्या कुटुंबातील वाटाव्यात इतका सच्चेपणा त्यांच्या भूमिकांतून दिसत असे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. देव कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी असून सीमा देव यांना श्रद्धांजली अर्पण करतो.'






देवेंद्र फडणवीस यांनी देखील सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, ज्येष्ठ अभिनेत्री सीमाताई देव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. गाजलेल्या 'आनंद' चित्रपटातील त्यांची संस्मरणीय भूमिका असो किंवा अनेक मराठी चित्रपट, एक मोठा कालखंड त्यांनी गाजवला. गेल्याचवर्षी रमेश देव आपल्यातून निघून गेले आणि आज सीमाताई!  ‘ब्लॅक अँड व्हाईट’ सिनेमात अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री आज आपल्यातून निघून गेली आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाच्या त्या साक्षीदार होत्या. यशाची शिखरे चढूनही त्यांच्यात असलेला नम्र भाव उल्लेखनीय होता. सीमाताई देव यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटात भूमिका केल्या. रमेश देव आणि सीमाताई देव हे केवळ त्यांच्या जीवनातील नाही तर पडद्यावरचे सुद्धा समीकरण होते. एक मोठा कालखंड या दोघांनी गाजविला. सीमाताईंच्या जाण्याने सिनेमा जगतातील एका अध्यायाची अखेर आहे.मी सीमाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.'






'ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले. अनेक चित्रपटांतून त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे देव कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.भावपूर्ण श्रद्धांजली.' असं ट्वीट शेअर करुन सुप्रिया सुळे यांनी सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली.










संबंधित बातम्या 


Seema Deo: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन; वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास