Sir Madam Sarpanch Movie : 'सर मॅडम सरपंच' (Sir Madam Sarpanch) हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. या सिनेमात सीमा बिस्वास (Seema Biswas) आणि एरियाना सजनानी (Ariana Sajnani) मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा येत्या 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'सर मॅडम सरपंच'च्या निर्मात्यांनी नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे. बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक प्रवीण मोरछलेने (Praveen Morchhale) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर सनकॅल प्रोडक्शनच्या (Suncal Production) बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती होत आहे.
सत्यघटनेवर आधारित 'सर मॅडम सरपंच'
'सर मॅडम सरपंच' हा सिनेमा एका सत्यघटनेवर आधारित आहे. हा सिनेमा भारतातील एका छोट्या खेड्यातील मुलीच्या आयुष्यावर आधारित आहे. त्या छोट्या खेड्यातील मुलगी परदेशात जाते, शिक्षण घेते. पण काही कारणाने ती परत आपल्या गावी येते आणि मेहनतीच्या जोरावर त्या गावची सरपंच बनते.
'सर मॅडम सरपंच' या सिनेमाची गोष्ट अनेकांना प्रेरणा देणारी आहे. सामाजिक विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजनदेखील करेल. या सिनेमाच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री सीमा बिस्वासच्या अभिनयाची जादू पाहायला मिळणार आहे. 'सर मॅडम सरपंच' या सिनेमाने फ्रान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार पटकावला आहे.
'सर मॅडम सरपंच'बद्दल मोरछले म्हणाला...
'सर मॅडम सरपंच' या सिनेमाबद्दल बोलताना प्रवीण मोरछले म्हणाला,"आजवर मी अनेक महिलांच्या प्रेरणादायी कथा ऐकल्या आहेत. अशा अनेक भारतीय महिलांना मी ओळखतो ज्यांनी परदेशातली चांगल्या पगाराची नोकरी नाकरली आणि भारतात राहण्याचा निर्णय घेतला. 'सर मॅडम सरपंच' हा सिनेमा अशाच सुपरवुमनवर आधारित आहे".
राजकारण, भ्रष्टाचार, पितृस्ताक पद्धत अशा अनेक गोष्टींवर भाष्य करणारा 'सर मॅडम सरपंच' हा सिनेमा आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून ते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा 14 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या