मुझफ्फरपूर (बिहार) : पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुलं पत्र लिहिणाऱ्या बॉलिवूडमधील 49 सेलिब्रिटींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारच्या मुझफ्फरपूरमधील सरदार पोलिस स्टेशनमध्ये गुरुवारी (3 ऑक्टोबर) गुन्ह्याची नोंद झाली आहे. या सेलिब्रिटींमध्ये रामचंद्र गुहा, मणीरत्नम, अनुराग कश्यप, अपर्णा सेन, श्याम बेनेगल आणि शुभा मुग्दल यांसारख्या मोठ्या व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी देशातील वाढत्या मॉब लिंचिंगच्या घटनांवर चिंता व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुलं पत्र लिहिलं होतं.

या सेलिब्रिटींविरोधात दोन महिन्यांपूर्वी वकील सुधीर कुमार ओझा यांनी एक याचिका दाखल केली होती. ज्यावर मुख्य न्यायदंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांच्या आदेशानंतर 3 ऑक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या सेलिब्रिटींविरोधात देशद्रोह, हिंसा पसरवण्याचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे यांसारख्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

आपल्या याचिकेत ओझांनी आरोप केला आहे की, "पंतप्रधानांना पत्र लिहिणारे सेलिब्रिटी देशाच्या प्रतिमेला धक्का लावत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली चांगली कामं योग्य नसल्याची सांगण्याचा प्रयत्न करुन, फुटीरतावादी शक्तीला एकप्रकारे बळ देत आहेत."

बॉलिवूड सेलिब्रिटींनी यावर्षी जुलै महिन्यात हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून पत्र लिहिलं होतं. देशात अल्पसंख्याक आणि अनुसूचित जाती-जमातींवर वाढत असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटना तातडीने रोखल्या जाव्यात, असं या पत्रात म्हटलं होतं.