Satish Kaushik : बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण आलं आहे. कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद रित्या झाल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे. तापसणीदरम्यान पोलिसांना काही आक्षेपार्ह औषधं सापडली आहेत. दरम्यान ज्या फार्महाऊसवर कौशिक यांचा मृत्यू झाला, त्या फार्महाऊसच्या मालकाच्या पत्नीनेच 15 कोटी रुपयांसाठी सतीश कौशिक यांची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


विकास मालू (Vikas Malu) या उद्योगपतीच्या फार्महाऊसवर कौशिक यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक यांच्याकडून माझ्या पतीने 15 कोटी रुपये घेतले होते. पण त्यांनी ती रक्कम कौशिक यांना परत केली नव्हती. त्यामुळे माझे पती आणि सतीश कोशिक यांच्यात वाद सुरू होता". 


महिला पुढे म्हणाली,"पैसे परत करण्याची वेळ येऊ नये यासाठी माझ्या पतीनेच औषध देऊन सतीश कौशिक यांना संपवले आहे. पतीने मित्रांच्या मदतीने सतीश कौशिक यांची औषध देऊन हत्या केली. सतीश कौशिक यांनी पतीला 15 कोटी रुपये दिल्याचा पुरावा आता माझ्याकडे नाही". सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास घेत आहेत. 






विकास मालू कोण आहे? (Who Is Vikas Malu)


विकास हा दुबईस्थित एनआरआय उद्योगपती आहे. कुबेर नावाच्या ग्रुपचा तो अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहे. या समूहाचे 45 उद्योग असल्याचा दावा त्यांच्या वेबसाईटवर करण्यात आला आहे. त्यांचे मसाले, आयुर्वेदिक उत्पादनं, चहा, रिसॉर्ट्स असे अनेक व्यवसाय आहेत. रिअल इस्टेट, केमिकल आणि पॅकेजिंग क्षेत्रातही त्यांची गुंतवणूक आहे. सतीश कौशिक यांचा तो कौटुंबिक मित्र आहे. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुली आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याने 13 मार्च 2019 रोजी सावनीसोबत दुसरं लग्न केलं. जानेवारीत सानवीकडून लैंगिक छळाचा आरोपही करण्यात आला होता. 


सतीश कौशिक यांना जीवाची भीती वाटत असती तर ते मालूच्या फार्महाऊसवर गेले असते का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पण पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय कुठलाही निष्कर्ष काढता येणार नाही.


संबंधित बातम्या


सतीश कौशिक मृत्यूप्रकरणी नवा खुलासा; फार्म हाऊसवर पोलिसांना सापडली 'आक्षेपार्ह औषधे'