मुंबई : बीआर चोप्रा यांची लोकप्रिय टीव्ही मालिका 'महाभारत' मध्ये इंद्र देवाची भूमिका साकारणाऱ्या आणि हिंदी-पंजाबी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते सतिश कौल यांचं शनिवारी कोरोनामुळे निधन झालं. ते 72 वर्षाचे होते. गेल्या आठवड्यात ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांना लुधियानाच्या श्री रामा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 


गेल्या काही वर्षापासून सतिश कौल यांची देखभाल करणाऱ्या त्यांच्या केयरटेकर सत्या देवी यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. सतिश कौल यांनी आतापर्यंत 300 पेक्षा जास्त हिंदी आणि पंजाबी चित्रपटात काम केलं आहे. त्यांनी महाभारत, सर्कस आणि विक्रम-वेताळ या लोकप्रिय मालिकेतही काम केलं आहे. 


आजारपण आणि हालाखीची परिस्थिती
गेल्या काही वर्षपासून अभिनेते सतिश कौल यांची आर्थिक परिस्थिती काही चांगली नव्हती. ते लुधियानामध्ये एका लहानशा घरात भाड्याने राहत होते. प्रत्येक महिन्यातील भाडे देता येईल एवढेही त्यांच्याकडे पैसे नसायचे. तसेच लॉकडाऊनच्या काळात त्यांना औषधांसाठीही पैसे नसायचे. सहा वर्षापूर्वी पटियाळा येथे घसरून पडल्यामुळे त्यांना चंदीगड येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दीड वर्षे या हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर ते काही काळ एका वृद्धाश्रमात राहिले. 


जवळपास 25 वर्षांपूर्वी सतिश कौल यांच्या आई-वडिलांच्या उपचारासाठी त्यांनी मुंबईतील आपला फ्लॅट विकला होता. नंतर लुधियानात त्यांनी एक अॅक्टिंग स्कूल सुरू केलं. त्यामध्ये त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. 


पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अभिनेता सतिश कौल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सतिश कौल यांचे पंजाबी चित्रपटातील योगदान कायम लक्षात राहिल असं कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सांगितलं. 


 




महत्वाच्या बातम्या :