नवी दिल्लीः अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलिवूड पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या 'जिनियस' या सिनेमातून सारा बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. या सिनेमाचा अभिनेताही निश्चित करण्यात आला आहे.

अभिनेता अनिल शर्मा यांचा मुलगा आणि सनी देओलच्या 'गदर' या सिनेमातील चिमुकला उत्कर्ष या सिनेमाचा अभिनेता असणार आहे. अनिल शर्माच्या या सिनेमातून उत्कर्ष आणि सारा दोघेही बॉलिवूड पदार्पण करणार आहेत.

साराची आई आणि सैफची पहिली पत्नी अमृता सिंहने सिनेमाविषयी अनिल शर्मांशी चर्चा केल्याचं बोललं जातंय. साराची एंट्री जवळपास निश्चित झाली असल्याची चर्चा आहे. यापूर्वी सारा करण जोहरच्या 'स्टुडेंट ऑफ दी इयर'मधून पदार्पण करणार असल्याची चर्चा होती. मात्र अमृता सिंहला काही अटी मान्य न झाल्याने साराचं बॉलिवूड पदार्पण पुढे ढकललं.