Sankarshan Karhade:  ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांचं निधन झालं. नवी मुंबईती नेरूळ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेष्ठ निरुपणकार बाबा महाराज सातारकर यांच्या निधनानंतर अभिनेता संकर्षण कर्‍हाडेनं (Sankarshan Karhade) एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून संकर्षणनं बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


संकर्षणची पोस्ट


संकर्षणनं बाबा महाराज सातारकर यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "बाबा महाराज सातारकर. फार, वाटायचं कधीतरी तुमच्या समोर बसुन , प्रत्यक्ष तुम्हाला पहात , तुमचा अभंग , किर्तन , प्रवचन ऐकावं. आता ती संधी नाही,  गळा भरून भरून आलाय. माझ्या लहानपणी बाबांनी नवीन कॅसेट प्लेअर आणला होता.त्यावर लावलेली पहिली कॅसेट बाबा महाराजांची “आम्ही दैवाचे दैवाचे”. ती ऐकतांना पहिल्यांदा मला “तुकोब्बा , नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि “रूक्मीणी पांडूरंग” ह्यांची बाबा महाराजांच्या गोड आवाजांत “दास पंढरी रायांचे” हे ऐकत ओळख झाली ..


पुढे संकर्षणनं पोस्टमध्ये लिहिलं, "आजी आजोबांनी अनेक वर्षं वारी केली.तुर्मासात चारही महिने पंढरपूरी मुक्कामी असायचे.आल्यावर आजी म्हणायची; “काय सांगू तुम्हाला पोरांनो ; बाबा महाराज प्रवचनात बोलतांना त्यांच्या तोंडातून शब्दं मोत्यांसारखे बाहेर पडतात आणि डोळ्यांत माणिक चमकतांत “ हे वर्णन ऐकून त्यांचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. तोच चेहरा डोळ्यासमोर आणुन रोज सकाळी त्यांच्या आवाजांत हरिपाठातल्या “बहुत् सुकृताची जोडी म्हणुनी विठ्ठल आवडी” हे ऐकतांना कित्ती गोड वाटतं काय सांगू ..?प्रवचन करतांना एखाद्या वाक्यानंतर, “काय ….?”किंवा किर्तनात अभंग गातांना लय वाढवण्यासाठी केलेलं “हं हं हं हं” हे आपल्याला प्रत्येक क्षणाला गुंतवून ठेवतं , ठेवत राहील! मला आजवर वारीला जाण्याचं भाग्यं नाही लाभलं पण , बाबा महाराजांनी मला आणि माझ्यासारख्या अनेकांना त्यांच्या आवाजानी, स्वरांनी, श्रवणाने वारकरी केलंय ..आज ते आपल्यातनं गेले पण मी तरी ह्या जगांत आहे तोवर रोजची सकाळ त्यांच्या आवाजातल्या हरिपाठानेच सुरू करीन !आज बाबा महाराजांना भेटून साक्षात परमेश्वर पण त्यांच्याच आवाजांत ऐकुन पाठ केलेला अभंग म्हणत असेल ;“धन्य आजी दिन संत दर्शनाचा , अनंता जन्मीचा शीण गेला” 






इतर महत्वाच्या बातम्या:


ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन