Ayodhya Ram Mandir: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही गुरुवारी (26 ऑक्टोबर) अयोध्येत (Ayodhya) पोहोचली. तिथे कंगनानं भगवान रामलल्लाचे दर्शन घेतले आणि पूजा देखील केली. कंगनातने अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिराच्या (Ram Mandir) बांधकामाची पहाणी देखील केली. कंगनानं अयोध्येतील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
कंगनानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये कंगना ही श्रीरामाचे दर्शन घेताना दिसत आहे. या फोटोला कंगनानं कॅप्शन दिलं, "आओ मेरे राम! व्वा! माझ्यावर श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद आहे, मी त्यांची भक्त आहे आणि आज मला त्यांचा इतका आशीर्वाद मिळाला आहे की, मला श्री हरी विष्णू परम पूजनीय अवतार, महान धनुर्धारी, अप्रतिम योद्धा, तपस्वी राजा, मरिदापुरुषोत्तम श्री राम यांची जन्मभूमी बघायला मिळाली. माझ्या तेजस या चित्रपटात रामजन्मभूमीची विशेष भूमिका आहे, त्यामुळे माझ्या मनात विचार आला की, मी रामलल्ला यांचे दर्शन घ्यावे,धन्य भाग मेरे राम, मेरे राम …"
श्री रामाचे दर्शन घेतल्यानंतर कंगनानं पत्रकारांसोबत संवाद देखील साधला. यावेळी ती म्हणाली, 'रामलल्लाचे मंदिर बांधले जात आहे. हा हिंदूंचा शतकानुशतके चाललेला संघर्ष आहे आणि आमच्या पिढीला हा दिवस पाहायला मिळत आहे. मी अयोध्येवर एक स्क्रिप्ट देखील लिहिली आहे आणि संशोधनही केले आहे. हा 600 वर्षांचा संघर्ष आहे. हे सर्व मोदी सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामुळे शक्य होत आहे..हिंदूंसाठी हे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असेल. जसे व्हॅटिकन ख्रिश्चनांसाठी आहे. आमच्या तेजस चित्रपटात राम मंदिराचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.'
कंगनाचा तेजस हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'तेजस' या चित्रपटात कंगनासोबतच वरुण मित्रा देखील प्रमुख भूमिका साकाणार आहे.