मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित 'संजू' चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हं आहेत. 'संजू'चा ट्रेलर पाहून तुरुंगातील एका दृश्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.
सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना पत्र लिहून याविषयी तक्रार नोंदवण्यात आली आहे.
तुरुंगातील टॉयलेट लीक होत असल्याचं दृश्य संजू चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. भारतातील तुरुंग प्रशासनाची वाईट प्रतिमा निर्माण होत असल्याचा आरोप, तक्रारदार पृथ्वी म्हस्के यांनी केला आहे.
'सरकार आणि तुरुंग प्रशासन कारावास आणि बराकींची चांगली काळजी घेते. टॉयलेट लीकेजचे कोणतेही प्रकार कधीच कुठेही ऐकिवात नाहीत. यापूर्वी गँगस्टर्सवर आधारित ज्या चित्रपटांमध्ये तुरुंगांचं चित्रण झालं आहे, त्यामध्ये असा कोणताही सीन नाही' असं तक्रारीत म्हटलं आहे.
सेन्सॉर बोर्डाने कोणतीही कारवाई न केल्यास चित्रपटावर स्थगिती आणण्यासाठी कोर्टात जाण्यावाचून कोणताही पर्याय नसेल, असा इशारा तक्रारकर्त्याने पत्रातून दिला आहे.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'संजू' चित्रपटात रणबीर कपूर हा मुख्य भूमिकेत आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात त्याने 1993 बॉम्बस्फोट खटल्यात तुरुंगात घालवलेल्या कालावधीचंही दर्शन घडणार आहे.
रणबीरशिवाय अनुष्का शर्मा, सोनम कपूर, करिष्मा तन्ना, दिया मिर्झा, मनिषा कोईराला, परेश रावल, विकी कौशल, महेश मांजरेकर अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात आहे.