नॉन हॉलिडे किंवा सणासुदीच्या काळात प्रदर्शित झालेला नसतानाही संजू चित्रपटाने दमदार कामगिरी केली. संजूने दुसऱ्या दिवशी 50 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला, तर तिसऱ्याच दिवशी शंभर कोटींच्या. दीडशे कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी या सिनेमाला अवघे पाच दिवस लागले. सातव्या दिवशी दोनशे कोटी, दहाव्या दिवशी अडीचशे कोटी, तर 16 व्या दिवशी या सिनेमाने तीनशे कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला. चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
आतापर्यंत भारतात पीके (2014), बजरंगी भाईजान (2015), सुलतान (2016), दंगल (2016), टायगर जिंदा है (2017) आणि पद्मावत (2018) या चित्रपटांनी तीनशे कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. बाहुबली 2 (हिंदी-2017) हा पाचशे कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा एकमेव चित्रपट
आहे.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित संजू चित्रपट पहिल्याच दिवशी 34.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवत 2018 मधील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला. बॉलिवूडच्या इतिहासात 'संजू' हा नॉन हॉलिडेला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा दुसरा सिनेमा ठरला आहे.
पहिल्या आठवड्यातील रविवारी 'संजू'ने 46.71 कोटींचा गल्ला जमवला होता. हिंदी सिनेमाच्या इतिहासात एका दिवसात इतकी कमाई करणारा हा पहिलाच सिनेमा आहे. अवघ्या तीन दिवसात या सिनेमाने शंभर कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता.
REVIEW : संजू : आयुष्यभराचा धडा
पहिल्या सोमवारी 25.35 कोटींची कमाई करणारा हा पहिलाच सिनेमा ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम सलमान खानच्या ‘रेस 3’ आणि संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’च्या नावावर होता.
रणवीर कपूरची मुख्य भूमिका असलेला हा सर्वाधिक ओपनिंग मिळालेला चित्रपट ठरला आहे. यापूर्वी रणवीरच्या चित्रपटांमध्ये 'बेशरम'ने पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई केली होती.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'संजू' चित्रपटात रणबीर कपूर, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, मनिषा कोईराला, परेश रावल, विकी कौशल, करिष्मा तन्ना, महेश मांजरेकर अशी कलाकारांची फौज आहे.