मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट चित्रित करत असतानाच खासदार संजय राऊत आणखी एका बड्या हस्तीचा जीवनपट रुपेरी पडद्यावर आणत आहेत. ती बडी हस्ती म्हणजे मुंबईचे ‘बंदसम्राट’ जॉर्ज फर्नांडीस.


भारतीय राजकारणात जॉर्ज फर्नांडीस यांना कामगार नेते म्हणून ओळखले जाते. जॉर्ज  फर्नांडीस यांनी 70-80 च्या दशकात जे राजकारण, समाजकारण केलं त्यांनीच आपल्याला प्रेरणा दिल्याने राऊत यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरेंनंतर जर कुणाचा आपल्यावर प्रभाव असेल तर तो जॉर्ज फर्नांडीस यांचा असंही राऊत यांनी म्हणाले. 2021 मध्ये जॉर्ज  फर्नांडीस यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्य़ा भेटीला येईल असे राऊत यांनी घोषित केले.

जॉर्ज फर्नांडीस यांच्यावरील चित्रपटाची संहिता माझ्याकडे तयार आहे. बाळासाहेबांवरील चित्रपटाचं काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच  फर्नांडीस यांच्यावरील चित्रपटाला सुरूवात करू.

लोकांना आता  फर्नांडीस यांच्या कामाचा विसर पडला असेल पण कोकण रेल्वेचं स्वप्न सत्यात उतरवण्यात जॉर्ज  फर्नांडीस यांचाच सर्वात मोठा हात होता, असं राऊत म्हणाले.

अद्याप चित्रपटाचं नाव काय ठेवावे हे ठरले नसल्याचे राऊत म्हणाले, पण ‘बंद’ हे नाव त्यांच्या चित्रपटासाठी योग्य वाटतंय, कारण ‘बंद’ या शब्दाची ओळख मुंबईला त्यांनीच करुन दिली, असं राऊत म्हणाले.