आर्चीला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गर्दीतून चोरट्यांनी अडीच लाख लांबवले
एबीपी माझा वेब टीम | 11 Aug 2016 10:07 AM (IST)
सांगली : आर्चीला पाहण्यासाठी चाहते 'सैराट', तर चोरटे झिंगाट, असंच काहीसं चित्र विटा इथं पाहायला मिळालं. कारण गर्दीचा फायदा उचलत, चोरट्यांनी तब्बल अडीच लाख रुपये लांबवले. काय आहे प्रकरण? ‘सैराट’ सिनेमातील आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरुची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. बीडपाठोपाठ आज सांगली जिल्ह्यातील विटा इथंही याचा प्रत्यय आला. एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी रिंकू विटा इथं आली होती. यावेळी रिंकूला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली. हे हॉटेल कराड-सोलापूर रस्त्यावर असल्याने हा रस्ताही गर्दीने फुलून गेला. त्यामुळे हा रस्ता बंद करुन वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. याच गर्दीचा फायदा चोरट्यानेही घेतला. कारण गर्दीतून वाट काढत मानसिंग बँकेचा कर्मचारी आयसीआयसीआय बँकेत रक्कम जमा करण्यासाठी जात होता. मात्र या कर्मचाऱ्याच्या हातातील अडीच लाख रुपये रोकड असलेली बॅग चोरट्याने हातोहात लांबवली. गर्दी आणि उपस्थित असलेले पोलीस बंदोबस्तात व्यस्त असल्याचं पाहून चोरट्यांनी संधी साधली.