सांगली: सैराट सिनेमातील अप्रतिम अभिनयाने सर्वांची मन जिंकणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरुच्या चाहत्यांना पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागल्या. रिंकू राजगुरू सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ इथं एका खाजगी कार्यक्रमासाठी आली होती. आर्ची येणार असल्याची बातमी जिल्हाभर वाऱ्यासारखी पसरली आणि कवठेमहांकाळ इथं तोबा गर्दी झाली. चाहत्यांनी तिला पाहण्यासाठी तुफान गर्दी केली.
गर्दी इतकी वाढली की त्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना यावेळी सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान, उभ्या महाराष्ट्राला झिंगायला लावणाऱ्या सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. परशा आणि आर्चीच्या संवेदनशील लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून ‘सैराट’ने पहिल्याच आठवड्यात 25 कोटींचा टप्पा पार केला आहे.