Saawan Kumar Tak : 'सनम बेवफा', 'सौतन' यांसारख्या सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्माता, लेखक आणि गीतकार सावन कुमार टाक (Saawan Kumar Tak) यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. चार दशकांहून अधिक काळ सुरु असलेल्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी संजीव कुमार ते सलमान खान यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले होते. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी निर्माता, दिग्दर्शक, गीतकार आणि लेखनाची धुरा सांभाळली होती. सावन कुमार टाक हे मागील काही दिवसांपासून आजारी असून, त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


सावन कुमार टाक यांच्या जवळच्या एका सूत्राने एबीपी न्यूजला माहिती देताना सांगितले की, सावन कुमार टाक यांना मागील काही काळापासून फुफ्फुसाचा आजार आहे, ज्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता आयसीयूमध्ये दाखल असलेल्या सावन कुमार यांचे हृदय देखील व्यवस्थित काम करत नाहीय. याशिवाय त्यांना इतरही अनेक आजार आहेत. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे.


अष्टपैलू व्यक्तिमत्त्व


जयपूर, राजस्थान येथे जन्मलेल्या सावन कुमार टाक यांना चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन करण्याव्यतिरिक्त कविता आणि गाणी लिहिण्याची खूप आवड आहे. केवळ स्वतःच्याच चित्रपटांसाठी नाही तर, त्यांनी इतर चित्रपट निर्मात्यांच्या अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहिली. त्यापैकी अनेक सुपरहिट ठरली.


'नौनिहाल' हा सावन कुमार टाक यांनी निर्माता म्हणून पदार्पण केलेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटामध्ये संजीव कुमार यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. सावन कुमार टाक, ज्यांनी आपल्या जवळपास सर्व मोठ्या स्टार्ससोबत काम केले. त्यांनी अभिनेत्री मीना कुमारीसोबत दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट बनवला, जो 1972मध्ये प्रदर्शित झाला. ‘गोमती की किनारे’ असे या चित्रपटाचे नाव होते.


अनेक बड्या कलाकारांसोबत केलेय काम


याशिवाय ‘हवस’, ‘सौतन’, ‘साजन बिन सुहागन’, ‘सौतन की बेटी’, ‘सनम बेवफा’, ‘बेवफा से वफा’, ‘खलनायिका’, ‘माँ’, ‘सलमा पे दिल आ गया’, ‘सनम हरजाई’, ‘चांद का तुकडा’ अशा चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. सावन कुमार हे विशेषतः महिलांवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. संजीव कुमार, मीना कुमारी व्यतिरिक्त त्यांनी राजेश खन्ना, जीतेंद्र, श्रीदेवी, जया प्रदा, सलमान खान अशा सर्व कलाकार मंडळींसोबत काम करून अनेक हिट चित्रपट दिले आहेत.


सावन कुमार यांची गाणीही गाजली!


सावन कुमार टाक यांनी लिहिलेली गाणी देखील खूप गाजली. यामध्ये, शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्या ‘सबक’ चित्रपटातील 'बरखा रानी जरा जमके बरसो’, ‘सौतन’ चित्रपटातील 'जिंदगी प्यार का गीत'  ही गाणी खूप लोकप्रिय झाली. सावन कुमार टाक यांनी अभिनेता हृतिक रोशन याचा पहिला चित्रपट 'कहो ना प्यार है'साठीही काही गाणी लिहिली होती, जी खूप गाजली.


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 25 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!