मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'सुलतान' चित्रपट आज देशभरातील 4500 स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. पण रिलीजच्या एक दिवस आधीच 'सुलतान' इंटरनेटवर लीक झाला आहे.
सायबर क्राईम एक्स्पर्ट दीप शंकर यांनी 'सुलतान' ऑनलाईन लीक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या माहितीनुसार, 'सुलतान'ची कॉपी डार्कनेटवर (Darknet) वर उपलब्ध असून लवकरच टोरेंटवरही अपलोड होऊ शकते.
आणखी एका एक्स्पर्टने 2 तास 36 मिनिटांच्या या सिनेमाचे काही स्क्रीन शॉट्स मीडिया हाऊससोबत सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
'सुलतान' लीक झाल्याच्या वृत्तानंतर अनेक वेबसाईट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत. सायबर इन्व्हेस्टगेटर किसलय चौधरी यांनी सांगितलं की, मंगळवारी संध्याकाळपासूनच वेबसाईट्स आणि लिंक्स तातडीने हटवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, यशराज फिल्म्सने याबाब कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
या सिनेमात सलमानसह अनुष्का शर्माही प्रमुख भूमिकेत आहे. ईदला रिलीज झालेल्या या सिनेमाला जबरदस्त ओपनिंग मिळण्याची अपेक्षा आहे. सिनेमाचे सर्व शो हाऊसफुल्ल आहेत.
चित्रपट ऑनलाईन लीक होण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. याआधी 'ग्रेट ग्रॅण्ड मस्त' हा सिनेमा प्रदर्शनाच्या 15 दिवस आधीच इंटरनेटवर लीक झाला होता. तर 'सुलतान' एक दिवस आधी रिलीज झाल्याचं म्हटलं जात आहे. याआधी 'उडता पंजाब'ही ऑनलाईन लीक झाला होता.