हेल्मेटविना प्रमोशन, 'लव्हरात्री' फेम अभिनेता आयुष शर्माला दंड
एबीपी माझा वेब टीम | 14 Aug 2018 01:54 PM (IST)
बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा सलमान खानचा मेव्हणा आयुष शर्माला ट्राफिक पोलिसांनी दंड ठोठावला.
मुंबई : वाहतुकीचे नियम सर्वांना सारखे असतात, हे गुजरातमधील वाहतूक विभागाने दाखवून दिलं आहे. 'लव्हरात्री' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा सलमान खानचा मेव्हणा आयुष शर्माला ट्राफिक पोलिसांनी दंड ठोठावला. स्कूटरवरुन सिनेमाचं प्रमोशन करताना हेल्मेटचा वापर न केल्यामुळे पावती फाडण्यात आली. गुजरातमध्ये बडोद्यातील रस्त्यांवर 'लव्हरात्री' चित्रपटाची टीम प्रमोशन करत होती. यामध्ये अभिनेता आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरिना हुसैन यांचाही समावेश होता. त्यावेळी दुचाकीस्वार असलेल्या एकानेही हेल्मेट घातलं नव्हतं. एककीडे आयुष-वरिनाचे चाहते त्यांच्यामागे पळत होते, तर दुसरीकडे काही जागरुक नागरिकांनी ते हेल्मेटविना प्रवास करत असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट केलं. वाहतूक पोलिसांनी याची तात्काळ दखल घेत लव्हरात्री टीमला अडवलं आणि प्रत्येकी शंभर रुपयांचा दंड ठोठावला. सलमानच्या पावलावर पाऊल ठेवत आयुष शर्मा सिनेसृष्टीत येत आहे, तसं त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत वाहतुकीचे नियमही धाब्यावर बसवत आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी अभिनेता कुणाल खेमूला विदाऊट हेल्मेट पकडून पोलिसांनी ई-चलन बजावलं होतं. त्याचप्रमाणे ट्राफिकमध्ये अडकलेल्या वरुण धवनने चाहत्यांसोबत भर रस्त्यात सेल्फी काढल्याने पोलिसांनी त्यालाही समज दिली होती.