मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर योद्धे तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात अभिनेता अजय देवगन मुख्य भूमिका साकारत आहे. 'तानाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटात शिवरायांची भूमिका कोण साकारणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र सुपरस्टार सलमान खान ही व्यक्तिरेखा साकारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अभिनेता सैफ अली खान 'तानाजी' चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, अशी अटकळ बांधली जात होती. सैफने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे, मात्र आपण नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत सैफने दिले. याचा अर्थ सैफ शिवरायांच्या भूमिकेत नसेल.

शिवरायांची भूमिका ही पूर्ण लांबीची नसल्यामुळे सलमान हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असेल. त्यामुळे शिवरायांच्या भूमिकेत सलमान कसा दिसेल, हे पाहण्याची उत्सुकता सर्वांना आहे. यापूर्वी, रितेश देशमुखच्या 'छत्रपती शिवाजी' या मराठी चित्रपटात सलमान झळकण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

सैफ हा राजपूत योद्धा उदयभान राठोडच्या भूमिकेत असल्याचं म्हटलं जात आहे. उदयभान राठोड हा मुघल राजा औरंगजेबाचा किल्लेदार होता. तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड यांच्यात 4 फेब्रुवारी 1670 ला सिंहगडाची लढाई झाली. सिंहगडावर झालेली ही लढाई तानाजी मालुसरेंच्या बलिदानासाठी ओळखली जाते.

सिंहगडाची लढाई

तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण शिवाजी महाराजांना देण्यासाठी गेले होते. त्यावेळी शिवाजी महाराजांनी सिंहगड ताब्यात घेण्याचा विचार सांगितला. परंतु तानाजींच्या घरी लग्न असल्याने शिवाजी महाराज बेत बदलणार होते. मात्र तानाजींनी स्वतःहून प्रेरित होऊन शिवाजींना या लढाईचं नेतृत्व आपल्याला देण्यास सांगितलं. तानाजी जिवंत असेपर्यंत शिवाजींना या मोहिमेवर जाण्याची गरज नाही. आधी लगीन कोंढाण्याचे, मगच रायबाचे असे तानाजींचे उद्गगार प्रसिद्ध आहेत.

तानाजी मालुसरेंनी या युद्धात बलिदान दिल्याचं शिवाजी महाराजांना समजलं, तेव्हा महाराजांना याचं अतिव दु:ख झालं आणि त्यांच्या तोंडून वाक्य बाहेर पडलं, 'गड आला पण सिंह गेला'. त्यानंतर या गडाचं नाव कोंढाणावरुन 'सिंहगड' असं बदललं.