मुंबई : 'आली समीप लग्नघटिका...' असं म्हणायची वेळ आली आहे. कारण अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि हॉलिवूड अभिनेता निक जोनास यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला आहे. दोन डिसेंबरला होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी चोप्रा आणि जोनास कुटुंब तयारीला लागले आहेत. अशात निकची मेहुणी आणि अभिनेत्री परिणीती चोप्राने निकच्या 'चपला चोरण्याचा' प्लान आखला असून किंमतही ठरवली आहे.


'हम आपके है कौन?' या चित्रपटातील 'जुते दो पैसे लो' नंतर भारतात बहुतांश घरांमध्ये चपला चोरण्याचा ट्रेण्ड रुजला. आता चोप्रांचं 'फिल्मी' कुटुंब त्याला अपवाद कसं असेल? साहजिकच परिणीतीने चपलांच्या मोबदल्यात किती रुपये मागायचे, याचाही विचार करुन ठेवला.

'जिजूंकडून चपलांच्या मोबदल्यात किती पैसे घ्यावे, यासाठी मी बोलणी सुरु केली. मी त्यांच्याकडे पाच मिलियन डॉलर मागितले. जिजू सर्वसाधारणपणे सगळे जण जे करतात, ते म्हणजेच घासाघीस करतील, असा माझा अंदाज होता, मात्र झालं उलटंच. ते म्हणाले तू मागतेस त्याच्या दुप्पट रक्कम द्यायला मी तयार आहे. तू 10 मिलियन डॉलर घे' असं एका एंटरटेनमेंट वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत परिणीती म्हणाली. 5 मिलियन डॉलरची भारतीय चलनात किंमत 37 कोटी रुपयांची घरात होते.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांचा शाही विवाहसोहळा 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर असे तीन दिवस रंगणार आहे. जोधपूरमधील राजवाड्यात पारंपरिक पद्धतीने दोघं लगीनगाठ बांधणार आहेत.

प्रियंका-निकच्या लग्नाला मोजक्या पाहुण्यांची उपस्थिती असेल. मित्र, नातेवाईक मिळून केवळ दोनशे जणांना निमंत्रण दिलं जाणार असल्याची माहिती आहे. प्रियंका आणि निक यांनी 18 ऑगस्ट रोजी भारतीय पद्धतीने रोका (साखरपुडा) केला.

26 वर्षांचा निक जोनस अमेरिकन गायक, गीतकार आणि अभिनेता आहे. प्रियंका निकपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे. प्रियंकाने भूमिका केलेल्या 'काँटिको' मालिकेतील तिचा सहकलाकार ग्रॅहम रॉजर्सने दोघांची ओळख करुन दिली होती.