मुंबई : अभिनेता रितेश देशमुख 'छत्रपती शिवाजी' या मराठी चित्रपटाच्या निर्मितीत गुंतला आहे. या चित्रपटात 'सुलतान' सलमान खानही एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तिरेखेत दिसण्याची शक्यता आहे.

 
सलमान खानने एका मुलाखतीत 'छत्रपती शिवाजी' चित्रपट भूमिका करण्याबाबत वाच्यता केली आहे. या चित्रपटातील माझं शूटिंग पाच-सहा दिवसांत आटपेल आणि त्याचा निर्माता रितेश आहे, हे एक बरं आहे, असं सलमान म्हणाला.

 
'मी हा चित्रपट करण्यासाठी स्वतःच्या मनाची समजूत घातली. मला माहित आहे, मी काय करायला जातोय. तुम्ही पाहालच' असं सलमान म्हणतो.

 
सलमानची आई सलमा खान मराठी शिकायला मदत करणार का, असा प्रश्न त्याला विचारताच सलमानने नकारार्थी मान डोलावली. 'संवादलेखक आणि रितेशच माझी मदत करतील. माझ्या आईची मराठी हिंदी आणि इंग्रजी मिश्रित आहे' असं म्हणत त्याने हास्याची लकेर उमटवली.

 
रितेशची पत्नी जेनेलिया डिसुझा-देशमुख तिच्या मुंबई फिल्म कंपनी बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करत आहे. टाइमपास, बीपी फेम दिग्दर्शक रवी जाधव यांच्याच खांद्यावर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा असेल.

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर आधारित ग्रँड मराठी चित्रपटाकडे तमाम मराठी प्रेक्षकांचे डोळे लागले आहेत. यापूर्वी रितेशच्या 'लय भारी' चित्रपटात सलमानने लहानशी भूमिका केली आहे.