नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाने हिट अॅन्ड रन प्रकरणात सलमानला मुक्त केले होते. पण या निर्णयाविरोधात या घटनेतील पीडित व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.

 

एम. नियामत शेख आणि त्याच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयला आव्हान देत, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती जे.एस. खेहर आणि न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचुड यांनी ही याचिका फेटाळली आहे.

 

खंडपीठाने याबाबत निर्णय देताना, या विरोधात महाराष्ट्र सरकारची याचिका आधीच दाखल असल्याचे सांगितले आहे. तर शेख यांचे वकील शिव कुमार यांनी यावर उच्च न्यायालयाने सांगितलेली नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही, असे सांगितले. त्यावर खंडपीठाने याचिका दाखल करणे हे उत्तर नसल्याचे सांगितले.

 

महाराष्ट्र सरकरच्या वतीने सलमानला उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करून कनिष्ठ न्यायलायचा निर्णायावरच शिक्कामोर्तब करण्याची मागणी केली आहे.