मुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफची मुख्य भूमिका असलेला 'टायगर जिंदा है' येत्या शुक्रवारी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अॅडव्हान्स बूकिंगला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी शो हाऊसफुल झाले आहेत. काही ठिकाणी सिनेमाचं तिकीट अडीच हजाराच्या घरात पोहचल्याची माहिती आहे.


पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीतील काही मल्टिप्लेक्सच्या तिकिटांची किंमत दोन हजार ते दोन हजार 400 रुपयांपर्यंत असल्याचा दावा एका इंग्रजी वेबसाईटने केला आहे. मुंबईतही बाराशे ते सोळाशेच्या दरम्यान तिकीटांची विक्री होत आहे.

'सिनेमाची सुरुवात तर चांगली झाली आहे. टायगर जिंदा है च्या अॅडव्हान्स बूकिंगला धमाकेदार ओपनिंग मिळाली आहे. अनेक ठिकाणी शो हाऊसफुल झाले आहेत. शुक्रवारची सुरुवात चांगली होईल, अशी आशा आहे' असं ट्वीट चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी केलं आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/942289117542457345

टायगर जिंदा है सिनेमातून सलमान-कतरिनाची जोडी तब्बल पाच वर्षांनी एकत्र येत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बासने केलं आहे. यशराज फिल्म्सने या सिनेमाची निर्मिती केली आहे.

सलमानचा ‘एक था टायगर’ हा चित्रपट 15 ऑगस्ट 2012 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 199 कोटी रुपये कमाई केली होती. या चित्रपटात सलमानसोबत कतरीना मुख्य भूमिकेत होती. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खानने केले होते. या चित्रपटात सलमान खानला ‘रॉ’ या गुप्तचर यंत्रणेचा एक एजंट दाखवण्यात आले होते. त्याचाच पुढचा भाग म्हणून ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाकडे पाहिलं जात आहे.