लंडन : दबंग अभिनेता सलमान खानला लंडनमधील ग्लोबल डायवर्सिटी अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं आहे. ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष किथ वाज यांच्या हस्ते सलमानला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार प्रदान केल्यानंतर वाज म्हणाले की, "ग्लोबल डायवर्सिटी पुरस्कार अशा व्यक्तींना दिला जातो, ज्यांनी जगभरात वैविध्यासाठी उल्लेखनीय काम केलं असेल. सलमान खान त्यापैकीच एक असल्याने, त्यांच्या कामाचा गौरव करण्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं."

सलमान खानचं कौतुक करताना वाज पुढे म्हणाले की, "सलमान खान हा लोकांसाठी आदर्श आहेच. शिवाय त्याच्या बीईंग ह्यूमन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी काम सुरु आहे."

पुरस्काराबद्दल सलमान म्हणाला की, "वास्तविक, यापूर्वी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पण हा पुरस्कार स्विकारताना मला अतिशय आनंद होत आहे. माझ्या वडिलांनीही अशा मोठ्या पुरस्कारांनी मला गौरवलं जाईल, अशी अपेक्षा केली नव्हती."

सलमान सध्या ब्रिटनमध्ये उद्याच्या दबंग कॉन्सर्टसाठी उपस्थित आहे. या कॉन्सर्टमध्ये सलमानसोबत दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा, जॅकलीन फर्नांडिस, डेसी शाहसुद्धा आहेत.

दरम्यान, यापूर्वी शाहरूख खान, महानायक अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि हॉलिवूड अभिनेते जॅकी चेन यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.