मुंबई : अभिनेता संजय दत्तला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावणारे निवृत्त न्यायाधीश पीडी कोडे आणि संजय दत्त 22 सप्टेंबरला बॉक्स आफिसवर आमनेसामने येणार आहेत. कारण संजय दत्त आणि पीडी कोडे यांचा सिनेमा एकाच दिवशी रिलीज होत आहे.

तुरुंगातून सुटल्यानंतर संजय दत्त पहिल्यांदाच भूमी या सिनेमातून कमबॅक करत आहे. तर न्यायमूर्ती कोडे निर्माता-दिग्दर्शक शैलेंद्र पांडे यांच्या सिनेमात न्यायाधीशाच्याच भूमिकेत दिसतील.

'भूमी'चा ट्रेलर :



न्यायमूर्ती कोडे यांनी 2006-07 साली मुंबईतील 1993 साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी टाडा कोर्टाअंतर्गत अनेक ऐतिहासिक निर्णय दिले होते. या प्रकरणात 100 पेक्षा अधिक जण दोषी आढळले होते, तर 12 पेक्षा जास्त आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

बॉम्बस्फोटानंतर मुंबई दंगलीवेळी बेकायदेशीरपणे एके-56 रायफल बाळगल्याप्रकरणी संजय दत्तवर खटला चालवण्यात आला होता. आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायमूर्ती कोडे यांनी संजय दत्तला सहा वर्षांची शिक्षा सुनावली होती.

‘’तुम्ही वयाच्या 100 व्या वर्षापर्यंत अभिनय करा, मी तुमच्या जीवनातले केवळ सहा वर्ष घेतले आहेत’’, असं शिक्षा सुनावल्यानंतर संजय दत्त म्हणाला होता.

22 सप्टेंबर रोजी संजय दत्त आणि न्यायमूर्ती कोडे एकाच दिवशी मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. फोटो जर्नलिस्ट शैलेंद्र पांडे यांच्या सिनेमासाठी न्यायमूर्ती कोडे यांनी मे 2015 मध्ये गोरेगाव फिल्म सिटीत शुटिंग केली होती.

'जेडी'चा ट्रेलर :



जेडी हा जय द्विवेदी (ललित बिष्ट) नावाच्या एका पत्रकाराची कहाणी आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईत हत्या करण्यात आलेल्या पत्रकार जेडे यांच्याशी सिनेमाचा काहीही संबंध नाही, असं शैलेंद्र पांडे यांचं म्हणणं आहे.

जेडी ही एका अशा पत्रकाराची कहाणी आहे जो करिअरमध्ये यशाची शिखरं चढत जातो, मात्र काही राजकारण्यांची पोलखोल करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो अडचणीत सापडतो, असंही शैलंद्र पांडे यांनी सांगितलं.