जोधपूर : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. काळवीट शिकार केसमध्ये अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सलमानविरोधात जोधपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. जर हे आरोप सिद्ध झाले, तर त्याला 7 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. 18 वर्ष जुन्या केससाठी सलमान जोधपुरात दाखल झाला आहे.

1998 साली 'हम साथ साथ है' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याचा आरोप सलमानवर करण्यात आला आहे. 9 जानेवारीला कोर्टासमोर हे प्रकरण सादर करण्यात आलं होतं. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने पुढील सुनावणीसाठी सलमानला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

काय आहे प्रकरण?

परवाना संपलेली शस्त्रं सलमानने बाळगल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्याकडे असलेल्या दोन्ही शस्त्रांचा परवाना 22 सप्टेंबर 1998 रोजी संपला होता. मात्र त्याने या शस्त्रांनी 1 आणि 2 ऑक्टोबर 1998 रोजी काळवीटांची शिकार केली, असा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.

सलमानची ही शस्त्रं चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान त्याच्या हॉटेलच्या रुममध्येच ती आढळल्याचं याचिकाकर्त्याने म्हटलं आहे. शिवाय काळवीटांचा मृत्यू गोळी लागूनच झाल्याचा शवविच्छेदन अहवालही याचिकाकर्त्याने कोर्टासमोर सादर केला आहे.

सलमान विरोधात चार केस दाखल करण्यात आले होते. अवैध शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी सलमानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

किती वर्षांची शिक्षा?

संबंधित पिस्तूल आणि रायफल परवान्याशिवाय बाळगणं अवैध असून जास्तीत जास्त तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. अवैध शस्त्रांस्त्रांचा वापर केल्याचं सिद्ध झाल्यास सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

सलमान दोषी सिद्ध झाल्यास त्याला वर्षांची शिक्षा सुनावली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सलमानला तीनपेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यास त्याची रवानगी तुरुंगात होईल. तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षा सुनावल्यास वरच्या कोर्टात अपिल करण्यासाठी आणि जामीन अर्ज दाखल करण्यासाठी वेळ देण्यात येईल.