जोधपूर : जोधपूर न्यायालय अभिनेता सलमान खान विरोधात अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर निकाल देणार आहे. यासाठी सलमान जोधपुरात दाखल झाला असून यावर कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे.


सलमानवर 1998 साली 'हम साथ साथ है' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याचा आरोप करण्यात आला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर आता कोर्टात सुनावणी होणार आहे.

9 जानेवारीला कोर्टासमोर हे प्रकरण सादर करण्यात आलं होतं. दोन्ही बाजुंचं म्हणणं ऐकल्यानंतर कोर्टाने पुढील सुनावणीसाठी सलमानला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

काय आहे प्रकरण?

परवाना संपलेली शस्त्र सलमानने बाळगल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्याकडे असलेल्या दोन्ही शस्त्रांचा परवाना 22 सप्टेंबर 1998 रोजी संपला होता. मात्र त्याने या शस्त्रांनी 1 आणि 2 ऑक्टोबर 1998 रोजी काळवीटांची शिकार केली, असा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.

दरम्यान सलमानची ही शस्त्र चोरी गेली अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान त्याच्या हॉटेलच्या रुममध्ये शस्त्र आढळली, असं याचिकाकर्त्याने म्हटलं आहे. शिवाय काळवीटांचा मृत्यू गोळी लागूनच झाल्याचा शवविच्छेदन अहवालही याचिकाकर्त्याने कोर्टासमोर सादर केला आहे.

अवैध शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी सलमानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जर हे आरोप सिद्ध झाले, तर त्याला 7 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.