मुंबई : सलमान खानचा राधे - युवर मोस्ट वॉंटेड भाई हा सिनेमा आता येत्या दोन दिवसांत रीलीज होतं आहे. या निमित्ताने सलमान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विशेष बाब अशी की सलमानचा बॉडीगार्ड होण्याला शेराला 26 वर्षं पूर्ण झाली आहेत. सलमान सध्या राधेबद्दल फार कुठे मुलाखती देताना दिसत नाही आहेत. पण यानिमित्ताने शेराशी बोलण्याची संधीही प्रत्येकजण घेतो आहे.


साधारण तीन वर्षांपूर्वी सलमानने आपण शेराचा मुलगा 'टायगर'ला हिंदी इंडस्ट्रीत लाँच करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर गेली दोन वर्षं कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शेराला या सलमानच्या घोषणेबद्दल विचारल्यानंतर शेराने जराही वेळ न दवडता कोरोनाची ही महामारी संपल्यावर सलमान आपल्या मुलाला लाँच करणार असल्याचं सांगितलं. इंग्रजी दैनिकाला मुलाखत देताना तो म्हणाला, सलमान माझ्या मुलाला लाँच करणार आहे. आता सध्या त्याचीच तयारी सुरू झाली आहे. राधेचं एकिकडे प्रमोशनचं काम चालू आहे. पण दुसरीकडे सलमान भाई माझ्या मुलाच्या सिनेमासाठीही तयारी करू लागला आहे.


सलमान आणि शेरा यांच्या नात्याला तब्बल 26 वर्षं झाली. गेल्या 26 वर्षांपासून शेरा सलमानसोबत सावलीसारखा असतो. सलमानच्या सिक्युरिटी गार्ड्सचा तो मुख्य आहे. सलमानने आपल्या मुलाला किंवा मुलीला लाँच करावं म्हणून अनेक लोक धडपडत असतात. सलमानने काही महिन्यांपूर्वीच आपला मित्र व अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या मुलीला सई मांजरेकरला आपल्या चित्रपटातून लाँच केलं होतं. इतकंच नव्हे, तर वारिना हुसेन, सोनाक्षी सिन्हा आदी अनेक कलाकारांना त्याने लाँच केलं आहे. सलमानने लाँच केलं की संबंधित हिरो किंवा हिरोईन इंडस्ट्रीत स्थिरावतात असं म्हटलं जातं. शेराची धडपडही यासाठीच आहे. कोरोनानंतरच्या पुढच्या एक दोन वर्षात आणखी एक टायगर इंडस्ट्रीत आला तर आश्चर्य वाटायला नको.