‘2.0’ हा सिनेमा भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा ठरणार असल्याचे बोलले जात आहे. पूर्ण सिनेमाचं बजेट 400 कोटी रुपये होतं, असं म्हटलं जात होतं. त्यानंतर 500 कोटी असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र, अक्षय कुमारच्या एका पोस्टने सर्वांनाच धक्का दिलाय.
अक्षय कुमारने ‘2.0’ सिनेमाचं पोस्टर शेअर केलंय. या पोस्टरद्वारे अक्षयने ही माहिती दिली की, 2.0 या सिनेमातील व्हीएफएक्सवर 75 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 544 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
गेल्यावर्षी दिवाळीतच हा सिनेमा रिलीज केला जाणार होता, मात्र व्हीएफएक्सचं काम पूर्ण झालं नव्हतं. त्यामुळे प्रदर्शनाची तारीख टळली.
अक्षय कुमारने पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “2.0 म्हणजे जगभरातील 3 हजार तंत्रज्ञांच्या मेहनतीचं फळ आहे. येत्या तीन दिवसात टीझरही रिलीज होईल.”
‘2.0’ सिनेमा थ्रीडीमध्येही प्रदर्शित केला जाणार असून, थ्रीडीसाठी लेटेस्ट कॅमेऱ्याने खास शूटिंग केली गेलीय.
अक्षय कुमारने त्याच्या वाढदिवशीच सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं होतं. त्या पोस्टरमध्ये अक्षयचा सिनेमातील लूकही समोर आला होता. निगेटिव्ह रोलमध्ये अक्षय या सिनेमात दिसणार असून, 2010 मध्ये रिलीज झालेल्या ‘रोबोट’ या सिनेमाचा सिक्वेल म्हणजे ‘2.0’ सिनेमा आहे. 29 डिसेंबर 2018 रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.