#सलमानसुटला : काळवीट शिकारप्रकरणातही सलमान खान निर्दोष !
एबीपी माझा वेब टीम | 25 Jul 2016 05:13 AM (IST)
जयपूर : हिट अँड रन प्रकरणानंतर अभिनेता सलमान खानला आता काळवीट शिकार प्रकरणातूनही दिलासा मिळाला आहे. कारण जोधपूर हायकोर्टाने सलमान खानला निर्दोष ठरवलं आहे. काय आहे आरोप? 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान, 12 ऑक्टोबर 1998च्या रात्री सलमानने जोधपूरच्या कनकनी गावात काळवीटची शिकार केली होती, असा आरोप त्याच्यावर होता. या प्रकरणात राजस्थान सरकारने 2006मध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र राजस्थानमधील जोधपूर हायकोर्टाने 15 मे 2013 रोजी ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर या खटल्याची पुन्हा सुनावणी सुरु झाली होती. त्याच्यावर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्ट आणि आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सलमानने आर्म्स अॅक्ट हटवण्याची याचिकाही केली होती. सलमानसह अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलमवर काळवीटची शिकार केल्याचा आरोप होता. काळवीट शिकारप्रकरण - जोधपूर पोलिसांनी बिश्नोई समाजाच्या तक्रारीनंतर सलमान आणि आणखी दोघांविरोधात 2 ऑक्टोबर 1998 रोजी काळवीट शिकारीचा गुन्हा दाखल केला होता. - सलमानला 12 ऑक्टोबर, 1998 रोजी अटकही करण्यात आली होती. त्यानंतर पाच दिवसांनी त्याची जामीनावर सुटका झाली होती. - 10 एप्रिल, 2006 रोजी खालच्या कोर्टाने सलमान खानला वन्यजीव कायद्याच्या कलम 51 आणि 52 अंतर्गत दोषी ठरवत पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. - 24 ऑगस्ट, 2007 रोजी सत्र न्यायालयाने खालच्या कोर्टाच्या निर्णयाविरोधात सलमान खानची याचिका फेटाळत शिक्षा कायम ठेवली होती. - 31 ऑगस्ट, 2007 रोजी राजस्थान हायकोर्टाने सलमान खानच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. - 12 नोव्हेंबर, 2013 रोजी हायकोर्टने सलमानला दोषी ठरवणारा खालच्या कोर्टाचा निर्णयही रद्द केला होता.