मुंबई : आमीर खान, सलमान खान, करिष्मा कपूर आणि रवीना टंडन या चौकडीचा 90 च्या दशकातील सर्वात गाजलेला विनोदी चित्रपट म्हणजे अंदाज अपना अपना. या सिनेमातील प्रत्येक सीन आणि संवाद चाहत्यांना तोंडपाठ आहेत. 'अंदाज..'चा सिक्वेल लवकरच येणार आहे, मात्र त्यातून आमीर-सलमान या मूळ जोडीलाच डच्चू देण्यात आला आहे.


आमीर-सलमान या जोडगोळी ऐवजी रणबीर कपूर, रणवीर सिंग, वरुण धवन यापैकी दोघांची निवड होण्याची शक्यता आहे.

1994 साली प्रदर्शित झालेल्या अंदाज अपना अपना चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलं होतं. लवकरच संतोषी याचा सिक्वेल काढणार असून मूळ चित्रपटातील एकाही मुख्य कलाकाराला यात भूमिका दिलेली नाही. यापूर्वी आमीर आणि सलमानची सिक्वेलसाठी निवड झाली होती, तर रवीना आणि करिष्माला आधीच सिनेमापासून दूर ठेवलं होतं.

'माझा आणि करिष्माचा फोटो भिंतीवर टांगला असेल. मग आमीर आणि सलमान म्हणतील- आमच्या बायका मेल्या, आता आम्ही काय करु' आणि मग ते 21 वर्षांच्या हिरोईनमागे पळतील.. असा असेल सिक्वेल' असं रवीना पूर्वी म्हणाली होती.

'विनोदासाठी तुम्हाला निष्पाप चेहरे हवेत. त्यावेळी सलमान-आमीर तरुण होते. आता ते बळजबरीने निष्पाप असल्याचा आव आणल्यासारखे वाटतील. मात्र 20 वर्षांचे हिरो असले, तर ते जास्त क्युट वाटेल. पन्नाशीचे हिरो तरुण हिरोईनमागे पळताना दाखवणं वल्गर वाटतं.' असं संतोषी म्हणाल्याचं 'डीएनए'च्या रिपोर्टमध्ये आहे.

रणबीर कपूर, रणवीर सिंग, वरुण धवन यासारख्या ताज्या दमाच्या कलाकारांकडे जबरदस्त कॉमेडी सेन्स
आहे, असंही राजकुमार संतोषी यांना वाटतं.