मुंबई : मिसेस मुख्यमंत्री अर्थात अमृता देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा पार्श्वगायिकेच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आगामी 'अ ब क' या चित्रपटासाठी त्यांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे. नवाझुद्दिन सिद्दीकी, तमन्ना भाटिया हे बॉलिवूड कलाकार चित्रपटात झळकणार आहेत.


'मुलगी वाचवा, मुलगी शिकवा' असा संदेश अमृता फडणवीसांनी गायलेल्या गाण्यातून जनतेला देण्यात येणार आहे. नुकतंच या गाण्याचं रेकॉर्डिंग मुंबईत पार पडलं. चित्रपटातील गाण्यांना राहुल रानडे यांनी संगीतबद्ध केलं आहे.

ग्रॅव्हिटी एण्टरटेन्मेन्ट आणि गोल्डन ग्लोब प्रस्तुत 'अ ब क' या चित्रपटाची निर्मिती मिहीर सुधीर कुलकर्णी यांनी केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रामकुमार शेडगे यांनी केलं असून कथा, पटकथा, संवाद आबा गायकवाड यांनी लिहिले आहेत.

'अ ब क' या चित्रपटात बालकलाकार सनी पवार, बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दिन सिद्दीकी, तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी, तन्वी सिन्हा यासारखे दिग्ग्ज कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू अशा पाच भाषेत तयार केला जाणार आहे.

यापूर्वी मिसेस मुख्यमंत्रींनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्यावर आधारित 'संघर्षयात्रा' या चित्रपटात पार्श्वगायन केलं होतं. त्याचप्रमाणे 'जय गंगाजल' या प्रकाश झा यांच्या चित्रपटातही त्यांचा गाता गळा ऐकायला मिळाला होता. त्याचप्रमाणे बिग बींसोबतही त्यांनी एक अल्बम केला होता. 'विश्वविधात श्रीपाद श्रीवल्लभ' या चित्रपटामध्ये त्यांच्या आवाजातील गाणं ऐकायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या :


कव्हरपेज, फॅशन शो ते अल्बम, मिसेस मुख्यमंत्र्यांचा बोल्ड अंदाज


मिसेस मुख्यमंत्र्यांचं पुन्हा मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन


अमृता देवेंद्र फडणवीस यांचं बॉलिवूडमध्ये पदार्पण