जोधपूर : 20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता  सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली. मात्र त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आलं.


सलमानला कैदी नंबर 106 देण्यात आला आहे. त्याला तुरुंगातला ड्रेस उद्या देण्यात येईल, अशी माहिती जोधपूर तुरुंगाचे डीआयजी विक्रम सिंह यांनी दिली. दरम्यान, सलमानने तुरुंगातलं जेवण नाकारल्याचीही माहिती आहे. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे, असंही ते म्हणाले.


सलमानने अजून ड्रेस बदललेला नाही. तो अजून आज घातलेल्याच कपड्यांवर आहे. त्याला उद्या कैद्यांचा ड्रेस देण्यात येईल. त्याने कोणतीही मागणी केलेली नाही. विशेष सुरक्षेत त्याला ठेवण्यात आलेलं आहे, असं विक्रम सिंह यांनी सांगितलं.

नेमकं प्रकरण काय आहे?

काळवीट शिकार प्रकरण 27 आणि 28 सप्टेंबर 1998 सालचं आहे. सलमान खान दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्यासोबत 'हम साथ साथ है' या सिनेमाची शुटिंग जोधपूरमध्ये करत होता. यावेळी 27 सप्टेंबरच्या रात्री तो सहकलाकार सैफअली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीसाठी निघाला.

यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर एकूण चार खटले दाखल आहेत.

कोणकोणत्या केस दाखल

  1. कांकाणी गाव केस - 5 एप्रिलला फैसला होणार. गोळीचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी आले. तेव्हा सलमानने इतर कलाकारांसोबत गाडीतून पळ काढला, तर दोन्ही हरणांचे मृतदेह तिथेच पडून होते.

  2. घोडा फार्म हाऊस केस - 10 एप्रिल 2006 रोजी सीजेएम कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. सलमान हायकोर्टात गेला. 25 जुलै 2016 रोजी त्याची सुटका करण्यात आली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली.

  3. भवाद गाव केस - सीजेएम कोर्टाने 17 फेब्रुवारी 2006 रोजी सलमानला दोषी ठरवून एका वर्षाची सुनावली. हायकोर्टाने या प्रकरणातही सलमानची मुक्तता केली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली.

  4. शस्त्रास्त्र केस - 18 जानेवारी 2017 रोजी कोर्टाने सलमानची सुटका केली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात हायकोर्टात दाद मागितली.


सलमान खानविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा, कलम 51 आणि अन्य कलाकारांविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा, कलम 51 आणि भारतीय दंड विधान कलम 149 अंतर्गत बेकायदेशीरपणे एका जागी जमण्याचा गुन्हा दाखल आहे.