सोलापूर : 'सैराट'मधील आर्ची आणि परशाप्रमाणेच लंगडा बाळ्या आणि सल्याने अवघ्या महाराष्ट्राला याड लावलं. प्रेक्षकांनी आर्ची-परशाप्रमाणेच सल्या आणि लंगड्याच्या भूमिकेलाही अक्षरश: डोक्यावर घेतलं. आता हाच लंगड्या म्हणजेच तानाजी गलगुंडे नव्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र तो कोणत्या सिनेमात नाही तर झेरॉक्स मशिनवर काम करताना दिसेल.

 

पायाने अपंग असल्याने तानाजी गलगुंडेला आता रोजगाराचं साधन देण्यात येणार आहे. पंचायत समितीच्या वतीने तानाजीला रोजगाराचं साधन म्हणून अपंग कोट्यातून झेरॉक्स मशिन दिलं जाणार आहे. पंचायत समितीचे उपसभापती तुकाराम ढवळे यांनी ही घोषणा केली. तानाजीच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 

तानाजीला येत्या 6 जून रोजी हे झेरॉक्स मशिन दिलं जाईल. त्यामुळे सिनेमातील प्रदीप बनसोडे आता खऱ्या आयुष्यात एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे.

 

तानाजी सध्या सोलापुरातील टेंभूर्णी इथे बीएच्या प्रथम वर्षात शिकत आहे.

 

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटात परशाच्या मित्राची म्हणजेच लंगडा बाळ्याची भूमिका साकारुन  प्रेक्षकांवर छाप सोडली आहे.