‘सैराट’ची पहिल्या आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई!
एबीपी माझा वेब टीम | 06 May 2016 01:15 PM (IST)
NEXT PREV
मुंबई : नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमाने आपल्या विक्रमांची घौडदौड सुरुच आहे. ‘सैराट’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच आठवड्यात तब्बल 25 कोटी 25 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. पहिल्या आठवड्यात कुठल्याही मराठी सिनेमाचं ही सर्वाधिक कमाई आहे. उभ्या महाराष्ट्राला झिंगायला लावणाऱ्या सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. परशा आणि आर्चीच्या संवेदनशील लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून ‘सैराट’ने पहिल्या आठवड्यात 25 कोटींचा टप्पा पार केला आहे. महत्त्वाचं म्हणजे पहिल्या विकेंडला म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसात तब्बल 12.20 कोटींचा गल्ला जमवला होता. पहिल्या विकेंडला इतकी कमाई करणारा हा मराठीतील पहिला सिनेमा ठरला आहे. यानंतर सोमवारी या सिनेमाने 2.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ‘सैराट’ने शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 3.80 कोटी आणि रविवारी 4. 85 कोटी आणि सोमवारी 2.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे अवघ्या चार दिवसात सैराटने 15.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे.