'सैराट'च्या पायरसीप्रकरणी 6 जणांना अटक, 6 हजार सीडी जप्त
एबीपी माझा वेब टीम | 06 May 2016 06:18 AM (IST)
मुंबई: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या सैराट सिनेमाला पायरसीचं ग्रहण लागलं आहे. याप्रकरणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर, पोलिसांनीही झाडाझडती सुरु केली आहे. पोलिसांनी आणखी सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर 'सैराट'ची पायरटेड कॉपी बनवल्याचा आरोप आहे. तसंच त्यांच्याकडून 23 सीडी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पुण्यात पहिली अटक झाली होती. त्यानंतर काल मुंबईतून सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जवळपास 7 ठिकाणी धाडी टाकून ही कारवाई केली. कारवाईदरम्यान आरोपींकडून सैराटच्या 23 सीडी, 3 कॉम्प्युटर आणि जवळपास 6 हजार रिकाम्या सीडी जप्त करण्यात आल्या आहेत. पायरेट कॉपीचे सर्व साहित्य जप्त पोलिसांनी पायरेट कॉपी बनवण्यासाठीचे सर्व साहित्य आरोपींकडून जप्त केले आहे. सैराटची कॉपी पायरेट करणाऱ्या सुरेंद्र घोसाळकर (34), हशीम खान (21), शाहबाज खान (22), मुश्ताक खान (23), इबनेश शाह (34) आणि अब्दुल शाह उर्फ बबलू (22) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. अटक करण्यात आलेल्या सर्वांवर पायरसी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागराज मंजुळेंची पोलिसात धाव सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सैराटची कॉपी लिक झाल्याप्रकरणी पोलिसांत धाव घेऊन तत्काळ कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यानंतर पोलिसांनी दखल घेत ही कारवाई केली आहे. यापूर्वी पुणे पोलिसांनी स्वारगेट इथं सैराट सिनेमाची सीडी विकताना कासीम शेख नावाच्या इसमाला पुणे पोलिसांनी अटक केली होती.