'आर्ची-परशा'मध्ये मला रोमियो-ज्युलिअट दिसले : इरफान
एबीपी माझा वेब टीम | 24 May 2016 06:21 AM (IST)
मुंबई : 'सैराट' चित्रपटाने देशभरातील सर्वसामान्य प्रेक्षकांसोबतच बॉलिवूडलाही 'याड लावलं' आहे. रितेश देशमुख, आमीर खान सारख्या अभिनेत्यांपाठोपाठ इरफान खानने स्तुतिसुमनं उधळली आहेत. 'आर्ची-परशा'मध्ये मला रोमियो-ज्युलिअट दिसले अशा भावना अभिनेता इरफान खानने व्यक्त केल्या आहेत. 'मराठी रोमियो-ज्युलिअट पाहून मी भारावून गेलो. पाश्चिमात्य सिनेमाकडे वळणाऱ्या तरुण पिढीने हा सिनेमाही पाहायला हवेत. ही भारतीय चित्रपटाची नवी सुरुवात असून प्रादेशिक सिनेमा जागतिक स्तरावर जात असल्याचं लक्षण आहे.' अशी प्रतिक्रिया इरफान खानने व्यक्त केली आहे. 'प्रादेशिक चित्रपट प्रत्येक वर्षी शिरपेचात मानाचा तुरा रोवत आहे. यंदा हा मान सैराटला लाभला आहे, यात काही शंकाच नाही.' असं इरफान म्हणतो. सैराट पाहून भारावलेल्या इरफान खानने सिनेमाचं स्क्रीनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात तयार होणारे उत्तम चित्रपट तरुण पिढीने पहावे यासाठी इरफान त्याच्या मुलांसह मुलांच्या समवयस्क मित्रांना दाखवणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेही सोबत स्क्रीनिंगला असतील, अशी माहिती आहे.