सैराट हा सिनेमा 29 एप्रिलला सर्वत्र रिलीज झाला. महाराष्ट्रासह देशभरातून आर्ची-परशा यांच्या आगळ्यावेगळ्या प्रेमकहाणीवर प्रेक्षकांनी अक्षरश: जीव ओवाळून टाकला. सैराट चित्रपटाला पहिल्याच आठवड्यात पायरसीचा फटका बसूनही, अनेक चाहत्यांनी थिएटर्समध्ये जाऊनच हा सिनेमा पाहणं पसंत केलं. त्यामुळेच या सिनेमाने ही ऐतिहासिक कमाई केली आहे.
29 एप्रिल रोजी ‘सैराट’राज्यभरातील 400 थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र दुसऱ्या आठवड्यात सिनेमाचे शो 8500 ते 14,000 पर्यंत वाढले. इतकंच नाही साताऱ्यात मध्यरात्री 12 आणि पहाटे 3 चा शोही सुरु होता. ‘सैराट’चं हे यश सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारं होतं.
'सैराट'मधील लंगड्या कोणाची झेरॉक्स मारणार?
‘सैराट’ने पहिल्या आठवड्यातील शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 3.80 कोटी आणि रविवारी 4.85 कोटी आणि सोमवारी 2.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे अवघ्या चार दिवसात सैराटची कमाई 15.10 कोटी रुपयांवर गेली.
यापूर्वी ‘नटसम्राट’ने एका आठवड्यात 16 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली होती. तर नऊ दिवसात नानाचा ‘नटसम्राट’ 22 कोटीच्या पार गेला होता. चौथ्या आठवड्यात हा आकडा 35 कोटींच्या घरात गेला होता. मात्र हा आकडा सैराटने अवघ्या 10 दिवसांतच पार केला.
VIDEO : 'झिंगाट'वर माधुरी, रितेश आणि अक्षय 'सैराट'
दुसरीकडे ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमाने पहिल्या आठवड्यात 7 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ने चार दिवसात 12.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
लय भारीने प्रदर्शनाच्या दिवशी 3 कोटी 10 लाख, शनिवारी 3 कोटी 60 लाख, रविवारी 3 कोटी 85 लाख आणि सोमवारी 2 कोटी 15 लाखांचा गल्ला जमवला होता. तर रवी जाधव यांच्या टाईपमास- 2 ने पहिल्या 3 दिवसांमध्ये तब्बल 11 कोटी रुपयांची कमाई केली होती.
मराठी सिनेमांची कमाई
यापूर्वी ‘दुनियादारी’ या सिनेमाने 26 कोटी कमावून, मराठी सिनेमाच्या कमाईचा ट्रेण्ड तयार केला होता. मग ‘टाईमपास’ या सिनेमाने त्यापुढे मजल मारून 32 कोटींची कमाई केली. याशिवाय ‘टाईमपास 2’नेही 28 कोटी कमावले होते. मात्र ‘लय भारी’ सिनेमाने तब्बल 38 कोटींचा गल्ला जमवून, मराठी सिनेसृष्टीत कमाईचा विक्रम प्रस्थापित केला होता.
मराठी सिनेमांची भरारी
*दुनियादारी : 26 कोटी
*टाईमपास – 32 कोटी
*टाईमपास 2 – 28 कोटी
*लय भारी – 38 कोटी
* नटसम्राट – 40 कोटी
*कट्यार काळजात घुसली – 31 कोटी