मुंबई : बॉलिवूडची 'उलाला गर्ल' अशी तिची ओळख असली, तरी 'डर्टी पिक्चर'शिवाय परीणिता, पा, इश्किया, कहानी अशा अनेक चित्रपटात बहुरंगी व्यक्तिरेखा अभिनेत्री विद्या बालनने साकारल्या आहेत. 'माझा कट्टा'वर गप्पा मारताना विद्याने बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच होत असल्याची खंत व्यक्त केली. शनिवारी रात्री 9 वाजता विद्या बालनसोबतच्या 'माझा कट्टा' चं 'एबीपी माझा'वर प्रक्षेपण होईल.

बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच होतं. एखादी भूमिका किंवा मोठा ब्रेक हवा असेल, तर काही निर्माते नवोदितांना 'कॉम्प्रोमाईझ' करण्यासाठी सांगतात, असं विद्याने सांगितलं. वैयक्तिक आयुष्यात आपल्याला असा अनुभव आला नसल्याचं ती म्हणाली. मुलींना पुरुषांच्या वाईट नजरेपासून वाचण्यासाठी काही सल्ला देण्याऐवजी पुरुषांनीच मर्यादेत रहावं, आपली  दृष्टी बदलावी, असं विद्याने सांगितलं.

मुन्नाभाई ते सुलू - आरजेचा प्रवास

'तुम्हारी सुलू' चित्रपटात विद्या आरजेच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे 'लगे रहो मुन्नाभाई' ते 'तुम्हारी सुलू' हा दोन आरजेंच्या भूमिकांमधला प्रवासही तिने उलगडून सांगितला. तुम्हारी सुलू चित्रपटातील सुलोचना ही गृहिणी असून स्पर्धेत बक्षीस म्हणून तिला नाईट शोसाठी आरजेचं काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे नाईट शोचा आरजे साकारण्यासाठी रेडिओवर नाईट शो ऐकून प्रॅक्टिस केल्याचं तिने सांगितलं. दिग्दर्शक सुरेश त्रिवेणींनी या विषयात 'पीएचडी'च केल्याचं सांगत विद्याने नाईट आरजेची झलकही विद्याने 'माझा कट्टा'वर दाखवली.

सैराटच्या शेवटाने सुन्न

आर्ची आणि परश्याचा 'सैराट' चित्रपट पाहिला आणि प्रचंड आवडला. मात्र सैराटचा शेवट पाहून आपल्याला प्रचंड अस्वस्थ व्हायला झाल्याचंही विद्या म्हणाली. 'झिंग झिंग झिंगाट' गाणं लागलं की आपली पावलं कायमच थिरकत असल्याचंही विद्याने सांगितलं.

विद्याचा जन्म मुंबईत चेंबुरमध्येच झाला. मुंबईतच लहानाची मोठी झाल्यामुळे मराठी भाषा नीट समजते. मात्र बोलताना अडखळायला होतं, असं तिने सांगितलं. मोठ्या बहिणीचा नवरा मराठी असल्यामुळे त्याच्याशी मराठीतच गप्पा मारत असल्याचं तिने सांगितलं.

अशी मिळाली 'हम पांच'

शाळेत कधीच नाटकात काम केलं नाही. झेव्हियर्स कॉलेजमध्ये असताना ऑडिशन दिली होती. त्यानंतर काही जाहिराती मिळाल्या. हम पांच सुरु झालं होतं. त्यात अशोक सराफांना पाहून माझ्या आईने अशी एखादी सीरिअल तुला मिळाली तर बरं होईल अशी इच्छा व्यक्त केली, नि काय योगायोग, मला त्यात राधिकाचा रोल मिळाला. मात्र अभ्यासामुळे मी ती मालिका सोडल्याचं तिने सांगितलं.

हम पांच नंतर अनेक अॅड फिल्म्स केल्याचं विद्या म्हणाली. कमी वेळ शूटिंग आणि जास्त पैसे मिळत होते. प्रदीप सरकार सारख्या बंगाली दिग्दर्शकांसोबत जास्त काम केलं. त्यातूनच पुढे 'परीणिता' मिळाला. ठरवून बॉलिवूडमध्ये गेले नाही, असं विद्या सांगते.

कायनातने आम्हाला प्रेमात पाडलं

'नो वन किल्ड जेसिका'च्या वेळी सिद्धार्थ रॉय कपूरशी भेट झाली. त्यानंतर भेटीगाठी वाढत गेल्या. 'कायनात' आम्हाला एकमेकांच्या प्रेमात पाडायच्या तयारीत लागली होती, असं विद्याने गमतीत सांगितलं.

सिल्क स्मिता आणि विद्या

'डर्टी पिक्चर'मध्ये सिल्क स्मिताची भूमिका साकारण्याआधी आईबाबांना त्याची पूर्ण कल्पना दिली होती, असं विद्याने सांगितलं. बहिणीने काही प्रश्न विचारले. सिनेमा पाहिल्यानंतर आई-बाबांच्या डोळ्यात पाणी तरळलं. यात एकदाही आम्हाला लाज वाटली नाही, कारण पडद्यावर तू नाही- स्मिता दिसत होती, अशी आठवण विद्याने सांगितली. सिल्कबद्दल आदर  बाळगून भूमिका साकारली, तर ती बिभत्स होणार नाही, असा सल्ला मिलन लुथरियांनी दिल्याचंही विद्याने सांगितलं.

एकता कपूर तुषारसोबत माझं लग्न लावणार होती

'हम पांच' मालिकेच्या वेळी निर्माती एकता कपूरकडे चेक आणायला गेले होते. त्यावेळी तिने आपल्याला तिच्या घरी येण्यास भाग पाडलं. तिने तुषार कपूरशी भेट घालून दिली. तुम्हा दोघांमध्ये काही झालं, तर बरं होईल, अशी गळही एकताने घातल्याचं विद्याने सांगितलं. तुषार मात्र आपल्याकडे ढुंकूनही पाहत नव्हता, अशी मजेदार आठवणही तिने सांगितली.

साडी आवडत असल्यामुळे मी तीच फॅशन कॅरी केली. सुरुवातीला मला अनेकांनी कपड्यांबाबत सल्ले दिले, असं विद्याने सांगितलं. 'हे बेबी' आणि 'किस्मत कनेक्शन' हे सिनेमे आपटल्यामुळे आपण हिरोईनसाठी योग्य नसल्याचं लक्षात आलं. भूमिकांच्या बाबत हावरट असल्यामुळे 'महिलाप्रधान' सिनेमे निवडल्याचं विद्याने सांगितलं.