Saif Ali Khan Net Worth : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सैफ अली खानवर झालेल्या चाकूहल्ल्यामुळे मागील काही दिवसांपासून तो प्रसिद्धीझोतात आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीबद्दल पोलिस तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शहजाद सध्या न्यायलयीन कोठडीत आहे. पोलिस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. आरोपीच्या विरोधात पोलिसांच्या हाती भक्कम पुरावे लागले आहेत, त्याच अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. आरोपी मोहम्मद शहजाद सैफ अली खानच्या घरी चोरी करण्याच्या उद्देशाने पोहोचला होता. यामुळे सैफ अली खानकडे किती संपत्ती आहे, असा प्रश्न अनेकांना पडला असेल, तर त्याचं उत्तर जाणून घ्या.
'नवाब' सैफ अली खानचा राजेशाही थाट
सैफ अली खान अभिनेता असण्यासोबतच राजघराण्याचा भाग आहे. सैफ अली खान पटौदी घराण्याचा छोटा नवाब आहे. सैफ अली खानला आलिशान घर, महाल आणि अनेक मौल्यवान वस्तू वारसा हक्काने मिळाल्या आहेत. यामध्ये पटौदी महालही सामील आहे. पटौदी पॅलेस छोटा नबाव म्हणजेच सैफ अली खानच्या नावावर आहे. जन्मापासून सैफ अली खान रॉयल लाईफस्टाईल जगत आला आहे. त्याच्या शाही थाटाची अनेकवेळा चर्चाही पाहायला मिळते.
‘पटौदी नवाब’ची संपत्ती किती?
अभिनेता सैफ अली खान चित्रपटांसाठी मानधन म्हणून मोठी रक्कम आकारतो. सैफ अली खान अभिनेता असण्यासोबतच पटौदी नवाब असल्याने कोट्यवधींची मालक आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, सैफ अली खानकडे एकून 1200 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये पटौदी महाल, आलिशान घर, ब्रँड एंडोर्समेंट, चित्रपट आणि वेब सीरिजमधील कमाई सामील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सैफ अली खान एका चित्रपटासाठी सुमारे 10 ते 15 कोटी रुपये फी घेतो. तर, सैफची पत्नी करीना कपूरची एकूण संपत्ती 485 कोटी रुपये आहे.
सैफकडील सर्वात मौल्यवान वस्तू कोणती?
सैफ अली खानकडे अनेक महागड्या मौल्यवान वस्तू आहेत, पण यातील सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे पटौदी पॅलेस. सैफ अली खान पटौदी याच्याकडे पटौदी कुटुंबाचा वारसा असलेलं पटौदी पॅलेस आहे. मॅजिक ब्रिक्सनुसार, पटौदी पॅलेसची अंदाजे किंमत 800 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. याशिवाय सैफ अली खानकडे अनेक महागडी घड्याळे आणि आलिशान कार कलेक्शनही आहे. यामध्ये ऑडी, मस्टँगसह अनेक महागड्या गाड्यांचा समावेश आहे.