मुंबई : अभिनेत्री करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर हा बॉलिवूडमधील स्टारकिड्सपैकी अनेकांचा लाडका आहे. त्याच्या बाललीला पाहण्यासाठी चाहते रोज सोशल मीडियावर फोटो-व्हिडिओजची उत्सुकतेने वाट पाहत असतात. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्या तैमूरला आघाडीच्या सुपरस्टारपेक्षाही जास्त स्टारडम मिळालं आहे. या तैमूरला लवकरच लहान भावंडं मिळण्याची चिन्हं आहेत.


'करिना कपूरकडे पुन्हा पाळणा कधी हलणार?' असा अगोचर सवाल चित्रपट समीक्षक कोमल नहाटा यांनी एका मुलाखतीत विचारला, ज्याचं उत्तर करिनाने 'दोन वर्षांनी' असं दिलं!

करिना आणि तिची जीवलग मैत्रिण अमृता अरोरा यांची मुलाखत सुरु होती. 'तू पुन्हा प्रेग्नन्सी प्लान करत असशील, तर मला सांग. मी देशच सोडून जाईन' असं अमृता बोलता-बोलता म्हणाली. हीच संधी साधत कोमल नहाटांनी करिनाला या मुद्द्यावर बोलतं केलं.

या प्रश्नाचं उत्तर करिना टाळेल, असं वाटत असतानाच करिनाने खुलेआमपणे उत्तर दिलं. 'हो, आम्ही दुसऱ्या बाळाचा विचार करत आहोत, पण इतक्यात नाही. किमान दोन वर्ष तरी नाही' असं उत्तर करिनाने दिलं.

सध्या सैफची बहीण- अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांची मुलगी इनाया नौमी खेमूची तैमूरला कंपनी आहे. मात्र लवकरच तैमूरला खेळायला सख्खं भावंडं मिळू शकतं.

करिना कपूर खान 37 वर्षांची आहे, तर सैफ 48 वर्षांचा आहे. 2012 मध्ये दोघांनी लगीनगाठ बांधली होती. सैफची आधीची पत्नी - अभिनेत्री अमृता सिंगपासून त्याला सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत. सारा 23 वर्षांची असून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. तर इब्राहिम 17 वर्षांचा आहे.