मुंबई : हटके चित्रपटांसाठी ओळखला जाणारा अभिनेता आयुषमान खुराणा आणखी एक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'बधाई हो' या आगामी चित्रपटाचा धमाल ट्रेलर रिलीज झाला आहे. आयुषमान मुंडावळ्या बांधून तयार असताना त्याची आई प्रेग्नंट झाल्यामुळे उडालेली खळबळ या सिनेमात पाहायला मिळणार आहे.


आयुषमानच्या आईची व्यक्तिरेखा प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता साकारत आहेत. गजराज राव वडिलांच्या, तर सुरेखा सिक्री आजीच्या भूमिकेत आहे. आयुषमानसोबत 'दंगल' गर्ल सान्या मल्होत्राची जोडी जुळली आहे. आयुषमान लग्नाच्या बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असताना आई गरोदर झाल्याने त्याच्यावर ओढवलेली नामुष्की आणि लाजिरवाणे प्रसंग ट्रेलरमध्ये दिसतात.

गेल्या अनेक दिवसांपासून आयुषमानच्या ट्विटर अकाऊण्टवर 'बधाई हो'च्या शुभेच्छांचा वर्षाव होत होता. त्यामागील कोडं अखेर उलगडलं आहे. विकी डोनर, नौटंकी साला, हवाईजादा, दम लगा के हैशा, शुभमंगल सावधान, बरेली की बर्फी यासारखे चित्रपट देणाऱ्या आयुषमानच्या नव्या सिनेमाकडून चाहत्यांना अपेक्षा आहेत.

अमित रविंद्रनाथ शर्माच्या खांद्यावर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा होती. 19 ऑक्टोबरला 'बधाई हो' प्रदर्शित होणार आहे.