मुंबई : शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या घटनांमुळे व्यथित झालेले बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील 360 शेतकऱ्यांचं कर्ज फेडण्यासाठी बिग बी यांनी दोन कोटी 3 लाख रुपयांची मदत केली आहे.


राज्य सरकारच्या कर्जमुक्ती अभियाना अंतर्गत 'वन टाइम सेटलमेंट'साठी पात्र असलेल्या राज्यातील 360 शेतकऱ्यांचं कर्ज फेडण्यासाठी बच्चन यांनी मदत केली. यापैकी बहुतांश शेतकरी हे विदर्भ-मराठवाड्यातील आहेत.

याशिवाय राज्यातील 44 शहीदांच्या कुटुंबातील 112 सदस्यांना अमिताभ यांनी 2.2 कोटी रुपयांची मदत दिली. रविवारी संध्याकाळी बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यावर हा कार्यक्रम झाला.

काही दिवसांपूर्वी ‘कौन बनेगा करोडपती’च्या दहाव्या मोसमाच्या लॉन्चिंग सोहळ्यात बच्चन यांनी यासंदर्भात घोषणा केली होती.

याआधी अमिताभ बच्चन यांनी केरळमधील नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत दिली होती. तसेच, अत्यावश्यक वस्तूही पाठवल्या होत्या.

अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत पोलिओ निवारण, स्वच्छ भारत, बेटी बचाओ अशा विविध सामाजिक उपक्रमांच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यानंतर जीवाची बाजी लावलेल्या शहीदांच्या कुटुंबीयांना आणि शेतकऱ्यांना मदत करुन त्यांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न केला आहे.