पुणे : रंगमंचावर नाट्यप्रयोग सादर करत असतानाच अभिनेता सागर चौगुले याचा मृत्यू झाला आहे. ‘अग्निदिव्य’ नाटकाच्या प्रयोगादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने सागरने टिळक स्मारक रंगमंदिरातील रंगमाचवर अखेरचा श्वास घेतला.
शाहू महाराजांच्या जीवनावर अधारित ‘अग्निदव्य’ या नाटकात शाहू महाराजांची मुख्य भूमिका सादर करत असतानाच 38 वर्षीय सागर शांताराम चौगुले याचा मृत्यू झाला. सागरच्या मागे आई, एक भाऊ, वहिनी, पत्नी आणि दिड वर्षांची मुलगी असा परिवार आहे. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा तो सख्खा भाचा होता.
आज पुण्यातील टिळक स्मारक रंगमंदिरामध्ये राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी सुरु होती. कोल्हापूरचा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला होता. आज हा संघ 40 कलाकारांसह ‘अग्निदिव्य’ हे शाहू महाराजांच्या जीवनावरील नाटक सादर करत होता. नाटकाच्या सुरवातीपासून शाहू महाराजांच्या मुख्य भूमीकेत असलेल्या सागर चौगुले यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवीली होती. मात्र, नाटकाचा मध्यांतर होण्याआधीच नाटकातील आपले संवाद म्हणताना सागरला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो रंगमंचावर कोसळला.
सहकलाकारांनी तातडीने सागरला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कोणताही प्रतिसाद देत नसल्याने त्याला पुणा हॉस्पिटलला हलविण्यात आले. पुना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर सागरचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
सागर हा मूळचा कोल्हापूरचा असून चित्रपट निर्माते शांताराम चौगुले यांचा मुलगा आहे. सागरचा कोल्हापूरमध्ये जहिरात क्षेत्राशी निगडीत व्यावसाय आहे. मात्र, अभिनयाच्या आवडीमुळे महाविद्यालयीन वयापासूनच तो नाटकांमध्ये भाग घेत होता. राज्य नाट्य स्पर्धेपूर्वीच सहा महिन्यांपूर्वीच ‘अग्निदिव्य’ हे नाटक बसविले होते. या नाटकात त्याने केलेल्या शाहू महाराजांच्या भूमीकेस सर्वच स्थरांतून वाहवा मिळत होती. आजही पुण्यात नाटक सादर करताना त्याने सर्वच रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळविली होती. सागरने नाटकाबरोबर काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. लवकरच त्याचा ‘सासू आली अडचण झाली’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता.